Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात “स्तनपान” विषयावर पोस्टर स्पर्धा उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ‘आजादी का अमृत महोत्सव’ अभियानांतर्गत व ‘स्तनपान सप्ताह’च्या अनुषंगाने शल्यचिकित्सा विभागातर्फे “स्तनपान” या विषयावर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

 

विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचे व जनजागृतीपर संदेशाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी कौतुक केले.

 

पूर्ण देशभरामध्ये “आजादी का अमृत महोत्सव” अभियान सुरू आहे. या अभियाना अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम शिकणाऱ्या तसेच परिचारिका प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी –  विद्यार्थिनींसाठी ‘स्तनपान’ हा विषय घेऊन पोस्टर्स स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख तथा उप अधिष्ठाता डॉ.मारोती पोटे, मुख्य अधिसेविका प्रणिता गायकवाड उपस्थित होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सर्व पोस्टर्सचे अवलोकन करून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचे व जनजागृतीपर संदेश यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांची मेहनत पाहून विद्यार्थ्यांनी, विविध स्पर्धेत कायम सहभाग घेत रहावा आणि स्वतःचा बौद्धिक विकास करावा अशी अपेक्षा अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी व्यक्त केली.

 

स्पर्धेचे परीक्षण शरीररचना शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.अरुण कसोटे व क्ष किरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. अंजली वासडीकर यांनी केले. स्पर्धेमध्ये ३२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी विविध विभागांचे प्रमुख व सदस्य उपस्थित होते.

 

स्पर्धेचा निकाल राखीव ठेवण्यात आला असून पुढील काळात होणाऱ्या कार्यक्रमामध्ये निकाल जाहीर होऊन विजेत्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी प्रकल्प प्रमुख डॉ. संगीता गावित, डॉ. प्रशांत देवरे,  डॉ.मिलिंद चौधरी, डॉ. रोहन पाटील,  डॉ.समीर चौधरी, डॉ. महेंद्र मल, डॉ. सागर कुरकुरे, डॉ.उमेश जाधव, डॉ.  विपिन खडसे, डॉ. स्नेहा वाडे, डॉ. प्रज्ञा सोनवणे, डॉ. झिया उल हक डॉ. सुनील गुट्टे, डॉ. स्मिता सोनटक्के, डॉ.  किरण सोंडगे यांच्यासह जनसंपर्क सहाय्यक विश्वजीत चौधरी,  वैशाली रोडे, विशाल पाटील आदींनी सहकार्य केले.

Exit mobile version