Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आ. मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश : शहीद जवानांच्या नावाने मुळगावी होणार चौकांचे सुशोभीकरण

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहीद जवानांच्या नावाने त्यांच्या मुळगावी चौकांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नातून १ कोटी २० लक्षचा निधी नुकतीच मंजूर झाला आहे. यातून हे भव्यदिव्य स्वरूपाचे काम साकारणार आहे.

 

चाळीसगाव तालुका हि शहिदांची भूमी आहे. अनेक शहीद जवानांनी भारतमातेच्या रक्षणासाठी बलिदान दिले आहे व त्यांचे नाव इतिहासात अजरामर झाले आहे. मात्र नोव्हेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या ३ महिन्याच्या कालावधीत एका पाठोपाठ एक अशा ४ जवानांना वीरगती प्राप्त झाली व अवघा तालुका शोकसागरात बुडाला. मात्र त्यांचे नाव अजरामर राहावे यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यांच्या प्रयत्नातून शहीदांच्या नावाने चौकांचे सुशोभीकरण व स्मृतीस्थळ उभारण्यासाठी प्रत्येकी ३० लाखांप्रमाणे १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय गुरुवार, २६ मे रोजी ग्रामविकास विभागातर्फे निघाला आहे. यामुळे तालुक्यातील शहीद जवान यश देशमुख (पिंपळगाव), सागर धनगर (तांबोळे खु.), संभाजी पानसरे (शिंदी), अमित पाटील (वाकडी) यांच्या नावाने त्यांच्या मुळगावी चौक सुशोभिकरण व स्मृतीस्थळ उभारले जाणार आहे. तत्पूर्वी राज्यात आतापर्यत मुलभूत सुविधा निधीतून शहिदांच्या नावाने सुशोभीकरण कामांसाठी निधी देण्यास तांत्रिक अडचणी असल्याचे कारण दिले जात होते. मात्र शहीद आपले कुटुंब, गाव सोडून देशासाठी प्राणांची आहुती देतात. त्यांच्या नावाने शहिदांच्या मुळगावी चौक तयार करण्याच्या धोरणास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात यावी अशी मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती. अखेर दोन वर्षांच्या पाठपुराव्यानंतर याबाबत शासन निर्णय निघाल्याने भविष्यात संपूर्ण राज्यभरात मुलभूत सुविधा निधीतून शहीद जवानांच्या नावाने चौकांचे सुशोभीकरण केले जाणार आहे. तसेच येणाऱ्या काळात चाळीसगाव तालुक्यातील यापूर्वी शहीद झालेल्या जवानांच्या नावाने त्यांच्या गावात देखील चौक सुशोभीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.

Exit mobile version