Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शरद पवार, अनिल देशमुखांनाही धमकीचा फोन !

मुंबई वृत्तसंस्था । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा कॉल आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरीही आज एका व्यक्तीने फोन करून धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, याबाबत पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

मातोश्री निवासस्थानी निनावी फोन आला होता तसाच फोन कॉल आज शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आला. दोघांच्याही घरातील लँडलाइन फोनवर विदेशातून अज्ञात व्यक्तीने कॉल केले. पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर तातडीने तपास सुरू करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान उडवून देण्याच्या धमकीनंतर या प्रकारावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गंभीर चर्चाही झाली तसेच संपूर्ण मंत्रिमंडळाने अशी धमकी देणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध केला. गुन्हे शाखेमार्फत तपास सुरू करण्यात आल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी नमूद केले होते. या कॉलनंतर आज देशमुख आणि शरद पवार यांच्या निवासस्थानीही धमकीचे फोन खणखणल्याने चिंता आणखी वाढली आहे.

राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या घरी धमकीचे फोन करणारी व्यक्ती कोण आहे? खरंच दाऊद गँगशी या व्यक्तीची लिंक आहे का? की यामागे आणखी कुणाचा हात आहे, याचा उलगडा पोलीस तपासानंतरच होऊ शकणार आहे. तूर्त धमक्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून आवश्यक असलेली सर्व खबरदारी घेतली जात आहे. मातोश्री निवासस्थानासोबतच पवार यांचं सिल्व्हर ओक निवासस्थान तसेच अनिल देशमुख यांच्या निवासस्थानालाही अधिक सुरक्षा पुरण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे राज्यमंत्रिमंडळाने कालच हे आंतरराष्ट्रीय कॉल असल्याने केंद्र सरकारने याची गंभीर दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Exit mobile version