Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शरद पवारांसारखे बायडन यांचेही भरपावसात भाषण

वॉशिंग्टन: वृत्तसंस्था । डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन फ्लोरिडा येथील सभेत भाषण करत असताना अचानक पाऊस आला. मात्र, बायडन यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. वर्षभरापूर्वा सातारा येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील पावसात सभा घेतली होती.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रत्यक्ष मतदानाला चार दिवस राहिले आहेत. त्यामुळे आता प्रचार शिगेला पोहचला आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत दोन्ही उमेदवारांनी जोर लावला आहे. अमेरिकेत सध्या बायडन यांची ‘सातारा टाइप’ सभेची जोरदार चर्चा सुरू आहे.

फ्लोरिडामधील सभेत भर पावसात सभेत भाषण करणाऱ्या ७७ वर्षांच्या बायडन यांनी अमेरिकन नागरिकांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे. अमेरिकेत सध्या पोस्टल आणि ई-मेलद्वारे मतदान सुरू आहे. तीन नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. यंदाची निवडणूक अटीतटीची होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही सर्वेक्षणात बायडन आघाडीवर असल्याचे सांगत येत आहे. या निवडणुकीत फ्लोरिडा हे महत्त्वाचे राज्य ठरणार आहे.

 

या सभेला हजर असणारे कारमध्ये बसून भाषण ऐकत होते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली होती. हा सभेचा व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ओबामा हे राष्ट्राध्यक्ष असताना बायडन उपराष्ट्रपती होते.

Exit mobile version