Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शरद पवारांना भेटल्याबद्दल अमित शाह यांचे गूढ कायम ठेवणारे उत्तर

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । शरद पवारांसोबतच्या भेटीबद्दल प्रश्न विचारल्यावर “सगळ्याच गोष्टी सार्वजनिकपणे केल्या जात नाहीत”, असं उत्तर अमित  शाह यांनी दिलं. त्यामुळे पवार-शाह यांची भेट झाली की, नाही? हा सस्पेन्स मात्र कायम आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसनं भेटीचं वृत्त फेटाळून लावलं असलं, तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं भेटीचा सस्पेन्स काय आहे. दिल्लीत शाह यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता

 

महाराष्ट्राचं राजकारण रविवारी दोन मुद्द्यांभोवती फिरताना दिसलं. एक शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा लेख, तर दुसरा मुद्दा होता शरद पवार-अमित शाह भेटीचा. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची अहमदाबादमध्ये भेट घेतल्याचं वृत्त समोर आलं. हे वृत्त राष्ट्रवादी काँग्रेसने फेटाळून लावलं आहे, तर शाह यांनी सूचक विधान करत भेटीचा सस्पेन्स कायम ठेवला आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. २६ मार्च रोजी अहमदाबादमधील एका फार्म हाऊसवर पवार-शाह यांची भेट झाल्याचं वृत्त एका गुजराती दैनिकाने दिलं. या वृत्तानंतर राज्यात या भेटीबद्दल चर्चा सुरू झाली.

 

शरद पवार-अमित शाह यांच्या गुप्त भेटीचं वृत्त राष्ट्रवादी काँग्रेसने फेटाळून लावलं आहे. या भेटीच्या वृत्तावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, “शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे दोन्ही नेते अहमदाबादमधून थेट मुंबईला आले. ते कोणालाही भेटले नाहीत. एका गुजराती दैनिकात त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी आली आहे. हे भाजपचं षडयंत्र आहे. शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी निव्वळ अफवा आहे,” असं मलिक यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version