Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शरद पवारांच्या तोंडून चुकीच्या गोष्टी वदवून घेतल्या गेल्या — फडणवीस

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत पलटवार केला. फडणवीसांनी वेगवेगळी कागदपत्रे दाखवत शरद पवारांना योग्य ती माहिती दिली गेली नसल्याचा दावा केला आहे.

 

परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपांवरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहे. भाजपा आणि परमबीर सिंग यांच्याकडून झालेले आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी फेटाळून लावले होते.

 

पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांची गाडी जप्त करण्यात आली. यात सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. एटीएसनंही काहीजणांना अटक केली. यातच माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर १०० कोटी वसुलीचा आरोप केला. ते सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. पण, शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, सिंग यांचं दावे तथ्यहिन आहेत. कारण देशमुख त्यावेळी क्वारंटाइन होते,” असं फडणवीस म्हणाले.

 

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “१५ तारखेची गृहमंत्र्यांची ही कार्यक्रम पत्रिका (प्रत दाखवत) आहे. १५ तारखेला ते एका खासगी विमानाने आले होते. १५ तारखेला ते आपल्या घरी होते. पण पोलीस विभागाच्या दैनंदिन नोंदीचा एक कागद आहे. त्यात १७ फेब्रुवारीची एक तारीख आहे. त्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईत  राहतील. तर अनिल देशमुख हे दुपारी ३ वाजता सह्याद्रीला येतील, अशी नोंद आहे. त्यानंतर २४ तारखेला पुन्हा अनिल देशमुख हे ११ वाजता मोटारीने निवासस्थानी जाणार असल्याचं पोलिसांची नोंद आहे. अर्थात त्या कार्यक्रमानुसार ते गेले असतीलच असा माझा दावा नाही.  सिंग यांनी जे पत्र लिहिलं आहे, त्यात मेसेजचा पुरावा दिला आहे. त्यात त्यांनी पाटील यांना बैठकीबद्दल विचारलेलं होतं. मला वाटतं शरद पवार यांना योग्य माहिती दिली गेली नाही. त्यांच्या तोंडून चुकीची माहिती बोलवून घेतली गेली. हे आता उघड झालं आहे,” असा आरोप फडणवीस यांनी केला.

Exit mobile version