Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शरद पवारांचा कृषी विधेयकांना अप्रत्यक्ष पाठिंबा

 

कणकवली: वृत्तसंस्था ।    महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं कृषी विधेयकावर घेतलेल्या भूमिकेवरून विरोधकांनी डिवचलं आहे. ‘ये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है…’ असा दावा भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केला आहे.

नव्या कृषी कायद्याची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याला राष्ट्रवादी काँग्रेसनं विरोध केला आहे. ‘भारत बंद’मध्येही राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होती. निलंबित खासदारांनाही शरद पवार यांनी पाठिंबा दिला होता. त्यासाठी पवारांनी एक दिवसाचा अन्नत्यागही केला होता. मात्र, या मुद्द्यावर राष्ट्रवादीनं संसदेत विरोधच केला नसल्याचं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे.

कृषी विधेयकावरील चर्चेसाठी शरद पवार राज्यसभेत उपस्थितच नव्हते असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यानंतर आता नीतेश राणे यांनी पवार साहेब आमच्यासोबत असल्याचं सांगत संभ्रम निर्माण केला आहे. ‘राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल कृषी विधेयकावर बोलले खरे, पण त्यांनी विरोध केला नाही. त्यांनी केवळ सभात्याग केला,’ असं नीतेश राणे म्हणाले.

 

‘शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचं कृषी विधेयकावरील भाषण तळ्यात-मळ्यात होतं. शिवसेनेला नेमकं कुठं जायचं आहे हे माहीत नाही. त्यांच्या नेतृत्वाला शेतीची काही माहिती नाही. त्यांचा पक्ष शेतीच्या प्रश्नावर कधीही भूमिका घेत नाही,’ असंही नीतेश राणे म्हणाले.

Exit mobile version