Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शरद पवारांकडून शुगर इन्स्टिट्यूट भेटीसाठी अमित शहांना निमंत्रण

 

पुणे : वृत्तसंस्था । दिल्लीत झालेल्या भेटीवेळी शरद पवार यांनी अमित शाह यांना पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याचं निमंत्रण दिलं आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांची काही दिवसांपूर्वी भेट झाली. दिल्लीत झालेल्या भेटीनंतर आता पवार-शाह यांची पुण्यात पुन्हा भेट होण्याची शक्यता आहे.

 

अमित शाह सप्टेंबरमध्ये एका कार्यक्रमासाठी पुण्यात येणार आहेत. पुण्याचा दौरा करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पवारांनी शाह यांना शुगर इन्स्टिट्यूटच्या भेटीसाठी खास निमंत्रण दिलं आहे.

 

सहकार मंत्रालय निर्माण करण्यात आल्यानंतर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. मोदींची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांनी ३ ऑगस्ट रोजी सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. राहुल गांधी यांनी विरोधकांची एकजूट करण्यासाठी ब्रेकफास्ट मीट आयोजित केलेली असताना दुसरीकडे शरद पवार यांनी अचानक भेट घेतल्यानं भेटीच्या कारणाबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती. मात्र, साखर कारखाने आणि सहकाराशी संबंधित विषयावर शाह यांची भेट घेतल्याचं पवारांनीच स्पष्ट केलं.

 

या भेटीतच शरद पवार यांनी अमित शाह यांना पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याचं निमंत्रण दिल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार आणि अमित शाह यांची बैठक सुरू असतानाच अमित शाहांनी पुण्यात येणार असल्याची माहिती पवारांना दिली. पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त येणार असल्याचं शाह म्हणाले. त्यावर शरद पवारांनी शाह यांना पुण्यात आलात, तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला आवर्जून भेट देण्याची विनंती करत निमंत्रण दिलं आहे.

 

शाह यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांनी शाह यांना एक पत्र दिलं होतं. त्या पत्राची प्रत त्यांनी ट्वीट केली होती. “आम्ही साखर उद्योगाशी संबंधित दोन महत्त्वाच्या मुद्द्यांकडे अमित शाह यांचं लक्ष वेधलं. यामध्ये साखरेला हमीभाव आणि साखर कारखान्यांच्या परिसरातच इथेनॉल मॅनिफॅक्चरिंग युनिट बसवणे या गोष्टींचा समावेश आहे. आम्हाला आशा आहे की या समस्यांमध्ये तातडीने लक्ष घालून  शाह  त्या सोडवण्यासाठी पावलं उचलतील”, असं आपल्या ट्वीटमध्ये शरद पवार यांनी   म्हटलं होतं.

 

Exit mobile version