Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

व्हाइट हाउस सशर्त सोडण्याचे ट्रम्प यांचे संकेत

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था । अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इलेक्टोरल कॉलेजकडून जो बायडन यांना अधिकृतपणे विजेता म्हणून घोषित करण्यात आलं तर मी व्हाईट हाऊस सोडायला तयार आहे, असं महत्त्वाचं विधान केलं आहे.

निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्यांनी , या निवडणुकीत घोटाळा झालाय. हा एक उच्च स्तरीय घोटाळा आहे, असा पुनरुच्चार केला. तसंच, जर इलेक्टोरल कॉलेजनी जो बायडन यांना विजेता म्हणून घोषित केलं तर ती त्यांची मोठी चूक ठरेल असंही ट्रम्प म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प यांचा अलिकडेच झालेल्या निवडणुकीत पराभव झाला आहे. पण, डोनाल्ड ट्रम्प आपला हा पराभव मान्य करायला तयार नव्हते. निवडणुकीत आपला पराभव होतोय, हे लक्षात येताच त्यांनी कांगावा करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आता व्हाइट हाउस सोडण्याबाबत ट्रम्प यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.

दरम्यान, इलेक्टोरल कॉलेज मतांवर अखेरचा निर्णय घेण्यासाठी पुढील महिन्यात बैठक घेणार आहे. 14 डिसेंबर रोजी अमेरिकी इलेक्टोरल कॉलेज बायडन यांच्या विजयाची घोषणा करण्याची शक्यता असून त्यानंतर 20 जानेवारी रोजी जो बायडन राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील अशी माहिती आहे.

Exit mobile version