व्यावसायिकाची ८३ हजाराची ऑनलाईन फसवणूक

धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील एका व्यावसायिकाला डीटीडीसी कंपनीमधील कस्टमर केअर सेंटर मधून बोलत असल्याची बतावणी करून ॲपच्या माध्यमातून बँक खात्यातून ८३ हजार रुपयाची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेबाबत शुक्रवार १७ मार्च रोजी रात्री ९ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, नितीन श्रावण पाटील (वय-४५, रा. भावे गल्ली, धरणगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सौर ऊर्जा प्रकल्पाचे व्यवसाय करून ते आपला ऊर्जा निर्वाह करतात. १६ मार्च रोजी त्यांना एका अनोळखी नंबर वरून डीटीडीसी कंपनीमधून कस्टमर केअर सेंटर मधील फोन असल्याचे सांगून कुरिअरचे डिटेल विचारून नितीन पाटील यांना माहिती भरण्यासाठी एक ॲप नावाची पीडीएफ फाईल पाठवली. त्यामध्ये आवश्यक ती माहिती भरायला सांगितली. त्यानुसार नितीन पाटील यांनी संपूर्ण माहिती भरली तर दुसऱ्या दिवशी त्यांच्या खात्यातून अज्ञात व्यक्तीने ८३ हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने परस्पर काढून त्यांची फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नितीन पाटील यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रारी दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात मोबाईल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे करीत आहे.

Protected Content