Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

व्यापाऱ्याकडून तीन शेतकऱ्यांची फसवणूक

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यू प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील तीन शेतकऱ्यांकडून १७ टन कांदा खरेदी करून पैसे न देता फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील रहिवासी विजय रामदास सोनवणे, आतिश शिवाजी बिराडे व गोपाल संजय पाटील हे शेतकरी असून त्यांनी त्यांच्या शेतात कांदा लागवड केली होती. दरम्यान २३ एप्रिल २०२२ रोजी संशयित आरोपी राजीव वाल्मीक कदम रा. लासलगाव ता.सटाणा जि.नाशिक आणि त्याचा नातेवाईक उदय रमेश मोरे रा. चाहार्डी तालुका चोपडा यांनी मिळून तीनही शेतकऱ्यांकडून एकूण १७ टन कांदा असा एकूण १ लाख ५३ हजार रुपये किमतीचा कांदा खरेदी केला. त्यानंतर या रकमेपैकी १ हजार रुपये शेतकऱ्यांना दिले व उर्वरित १लाख ४६ हजार रुपये परत दिले नाही. अनेक वेळा पैशांची मागणी केली, परंतु राजू कदम आणि उदय मोरे यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. अखेर विजय सोनवणे यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शनिवारी १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता संशयित आरोपी राजीव वाल्मीक कदम रा. लासलगाव ता. सटाणा जि. नाशिक आणि उदय रमेश मोरे रा. चहार्डी ता. चोपडा या दोघांविरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप राजपूत करीत आहे.

Exit mobile version