Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास मुभा द्या, अन्यथा ‘फाम’ पुकारणार असहकार आंदोलन !

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यापासून सुरू असलेला लॉकडाऊनचा तिढा अद्यापही कायम असून व्यापाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. शासनाने जर १ ऑगस्टपासून दुकाने सकाळी ९ ते ७ उघडण्यास मुभा दिली नाही, तर राज्यभर असहकार आंदोलन पुकारण्यात येणार असल्याची माहिती फामचे उपाध्यक्ष ललित बरडीया यांनी दिली आहे.

व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘फाम’ संघटनेची बैठक मुंबई येथे फामचे अध्यक्ष विनेश मेहता व महासंचालक आशिष मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी पार पडली. बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. तीन महिन्यानंतर मिशन बिगीन अगेन अंतर्गत काही अटीशर्तीच्या अधीन राहून दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. राज्यात मात्र काही ठिकाणी अद्यापही पूर्णवेळ दुकाने उघडण्यास मुभा नसल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. अगोदरच अडचणीत असलेल्या व्यापाऱ्यांचे सध्या पार कंबरडे मोडले गेले आहे. शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजीकल डिस्टनसिंग आणि इतर खबरदारीचे उपाय योजण्याचे सांगत दुकाने, आस्थापना पूर्णवेळ सुरू राहण्याची परवानगी द्यावी. शासनाने परवानगी न दिल्यास १ ऑगस्टपासून राज्यभर असहकार आंदोलन पुकारण्याचा निर्णय ‘फाम’च्या बैठकीत घेण्यात आला. फामचे उपाध्यक्ष ललित बरडीया यांनी याबाबत माहिती दिली.

Exit mobile version