व्यवसाय करण्याच्या आमिषाने तीन लाखांत ऑनलाईन फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या महिलेला ऑनलाईन व्यवसायाचे आमिष दाखवून चार जणांनी ३ लाखांत फसवणूक केल्याचा प्रकारसमोर आला आहे. याप्रकरणी शहर पोलिसात चारही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, शिवाजी नगर भागातील खडकेचाळ भागात वैशाली रमेश बाविस्कर या वास्तव्यास आहेत. १ मे ते ३० मे दरम्यानच्या काळात त्यांना राहूल अग्रवाल, तुषार इंगळे, महेश शिंपी व पल्लवी शिंपी या चार जणांनी ऑनलाईन व्यवसाय करण्योच सांगत त्यातून जास्तीचा फायदा होईल असे आमिष दाखविले. या ऑनलाईन व्यवसायासाठी कर्ज काढण्यास भाग पाडून फिर्यादीचे स्टेट बँकेच्या खात्यावरुन रक्कम एचडीएफसी बँकेच्या खात्यावर वर्ग करण्यास सांगितले. त्यानंतर ऑनलाईन मिटींग घेवून वैशाली बाविस्कर यांच्याकडून ओटीपी क्रमांक मिळवला. या क्रमांकाच्या आधारावर वैशाली बाविस्कर यांच्या खात्यातून २ लाख ६१ हजार व २७ हजार ६०८ व ११ हजार ६६४ असे एकूण ३ लाख २८१ रुपये परस्पर काढून घेतले. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर वैशाली बाविस्कर या संबंधितांकडे याबाबत विचारणा करण्यास गेली असता, महेश शिंपी व पल्लवी शिंपी या दाम्पत्याने वैशाली बाविस्कर यांना शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण करत, जीवे मारण्याची धमकी दिली. महिनाभर झालेल्या या प्रकाराबाबत अखेर वैशाली बाविस्कर यांनी बुधवार, १ जून रोजी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन राहूल अग्रवाल, तुषार इंगळे, महेश शिंपी व पल्लवी महेश शिंपी दोन्ही रा. पंचमुखी हनुमान मंदिराच्या पाठीमागे, तिसरी गल्ली, जळगाव या चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रविंद्र प्रभाकर सोनार हे करीत आहेत.

Protected Content