Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा

स्टॉकहोम: वृत्तसंस्था । वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील २०२० चा नोबेल पुरस्कार हार्वे अल्टर, मायकल होउगटन आणि चार्ल्स राइस यांना जाहीर करण्यात आला आहे. या शास्त्रज्ञांना हिपाटायटिस सी विषाणूच्या शोधासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

या शास्त्रज्ञांना जवळपास ११ लाख २० हजार डॉलरचा पुरस्कार मिळणार आहे. रक्तातून निर्माण होणाऱ्या हिपाटायटिस आजाराविरोधातील लढाईत या शास्त्रज्ञांचे योगदान महत्त्वाचे आहे. हिपाटायटिसच्या आजारामुळे मोठ्या संख्येने लोकांना सायरोसिस आणि यकृताचा कर्करोग होतो. या तिन्ही शास्त्रज्ञांनी ‘हिपाटायटिस सी’ ची ओळख पटवता येईल अशा नोवल विषाणूचा शोध लावला आहे.

पुरस्काराची रक्कम तिन्ही शास्त्रज्ञांना समान वितरीत करण्यात येणार आहे. या आठवड्यात अन्य नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात येणार आहे. मायकल हाउगटन युनिर्व्हसिटी ऑफ अल्बार्टा आणि चार्ल्स राइस रॉकफेलर युनिर्व्हसिटीशी संबंधित आहेत.

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य आणि शांततेच्या क्षेत्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात येणार आहे. तर, अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा पुढील आठवड्यात करण्यात येणार आहे. यंदाच्या शांततेच्या नोबेल पुरस्काराच्या शर्यतीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही समावेश आहे.

Exit mobile version