Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वेलिंग्टन कसोटीत भारताचा दारूण पराभव

वेलींग्टन वृत्तसंस्था । येथील पहिल्या कसोटी यजमान न्यूझीलंड संघाने टिम इंडियाचा तब्बल दहा गडी राखून दारूण पराभव केला आहे.

भारताचे कसोटी विजयाचे अभियान अखेर यजमान किवीजनी संपुष्टात आणले आहे. यामुळे भारतीय संघाला अखेरीस दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन कसोटी सामन्यात, यजमान संघाने भारतावर १० गडी राखून मात केली. तळातल्या फलंदाजांनी डावाने पराभवाची नामुष्की टाळली. दुसर्‍या डावात भारतीय संघाने न्यूझीलंडला केवळ ९ धावांचं आव्हान दिलं. लॅथम आणि ब्लंडल या फलंदाजांनी विजयासाठी आवश्यक असलेल्या धावांची औपचारिकता पूर्ण करत न्यूझीलंडला मालिकेत १-० अशी आघाडी मिळवून दिली आहे. न्यूझीलंडचा कसोटी क्रिकेटमधला हा शंभरावा विजय ठरला आहे.

वेलिंग्टन कसोटी सामन्यात सलग दुसर्‍या डावातही भारतीय फलंदाजांनी अतिशय सुमार कामगिरी केली. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्करल्यामुळे भारतीय संघ दुसर्‍या डावात फक्त १९१ धावांपर्यंत मजल मारु शकला. ज्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी अवघं ९ धावांचं आव्हान मिळालं. तिसर्‍या दिवसाच्या अखेरीस भारतीय संघ ३९ धावांनी पिछाडीवर होता. त्यामुळे चौथ्या दिवशी भारतीय फलंदाज संयमाने फलंदाजी करतील असा अंदाज होता, मात्र ट्रेंट बोल्टने अजिंक्य रहाणेला माघारी धाडत भारताला पहिला धक्का दिला. यानंतर भारताचे सर्व फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतत राहिले. एका क्षणाला भारतावर डावाने पराभव स्विकारण्याची वेळ आलेली होती. मात्र अखेरच्या फळीत ऋषभ पंत आणि इशांत शर्मा यांनी फटकेबाजी करत भारताचा डावाने पराभव टाळला. दुसर्‍या डावात न्यूझीलंडकडून टीम साऊदीने ५ तर ट्रेंट बोल्टने ४ बळी घेतले. याव्यतिरीक्त डी-ग्रँडहोमला एक बळी मिळाला. न्यूझीलंडचा कसोटी क्रिकेटमधला हा शंभरावा विजय ठरला आहे. या माध्यमातून आता यजमान संघाने कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

Exit mobile version