Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वृध्दाच्या मृत्यूनंतर डॉक्टरचे ‘होम क्वॉरंटाईन’ ( व्हिडीओ )

कोरोना संशयिताच्या मृत्यूने खळबळ : अफवांवर विश्‍वास ठेवू नका

जामनेर राहूल इंगळे । येथे चार दिवसांपूर्वी मृत झालेल्या एका वृध्दामुळे संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. या वृध्दाचा कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आला होता. मात्र आता याबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर संबंधीत रूग्णावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी ‘होम क्वॉरंटाईन’ केले असून कर्मचार्‍यांनाही सुरक्षा घ्यायल लावली आहे. तर, अंत्यसंस्काराला गेलेल्यांनाही याच प्रकारे चौदा दिवस विलग राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तथापि, जनतेने कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्‍वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील एका वृध्दाचा चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. हा वृध्द सुरत येथून आला होता. त्याला कोरोना झाला असल्याचा संशय निर्माण झाला होता. मात्र त्यांची कोरोनाची चाचणी निगेटीव्ह आली होती. तर त्यांना न्यूमोनिया असल्याचे निष्पन्न झाले होते. याचमुळे त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. यामुळे त्या वृध्दावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी स्वत:ला १४ दिवसांसाठी होम क्वॉरंटाईनमध्ये ठेवले आहे. त्यांनी आपल्या कर्मचार्‍यांनाही याच सूचना दिल्या आहेत. याबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर आता त्या वृध्दाच्या अंत्ययात्रेला गेलेल्यांनाही याच सूचना देण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी दिली आहे. या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार सुहास चौधरी यांनी त्यांना विचारणा केली असता डॉ. सोनवणे यांनी या प्रकरणी कोणत्याही अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. याप्रसंगी तहसीलदार अरूण शेवाळे, उपजिल्हा रूग्णालयाचे अधिकारी डॉ. विनय सोनवणे, डॉ. प्रशांत महाजन, पोलीस निरिक्षक प्रताप इंगळे
आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या सर्वांनी प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

खाली पहा : या संदर्भात पत्रकार सुहास चौधरी यांनी दिलेल्या माहितीचा व्हिडीओ.

Exit mobile version