Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वीज दर कपातीमुळे उद्योग वृध्दीसाठी हातभार लागणार – ॲड. संदीपभैय्या पाटील

जळगाव प्रतिनिधी । राज्यातील तीनही वीज कंपन्या व वीज नियामक आयोगामध्ये समन्यवय साधून वीजदर कमी करण्याचा निर्णय उर्जामंत्री नितीन राऊत यांनी घेतल्याने जळगाव काँग्रेसने स्वागत केले आहे, या निर्णयाने उद्योग व व्यवसाय वृद्धीसाठी हातभार लागणार आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष ॲड. संदीपभैय्या पाटील यांना पत्रकान्वये कळविले आहे.

उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजदर कमी करण्याचा निर्णय घेतल्याने मोठी उपलब्धी असून या निर्णयाने उद्योग व व्यवसाय वृद्धीसाठी हातभार लागणार आहे. या लॉकडाऊन मधील काळात तीन महिन्यांचा वाणिज्यिक व औद्योगिक वीज वापराचा ‘स्थिर आकार’ नाही, राज्यातील वीज दर सरासरी ७ टक्के कमी करण्यात आले आहेत. वाणिज्यिक व औद्योगिक दर येणाऱ्या पाच वर्षांमध्ये वापर आकारानुसार सुमारे १० ते १५ टक्के कमी करण्यात आलेले आहेत. घरगुती विजेचे दर हे वापर आकारानुसार ५ टक्के एवढे कमी करण्यात आले आहेत. औद्योगिक व व्यावसायिक वीज ग्राहकांना वाढीव वीज वापरांवर ७५ पैसे प्रति युनिट सवलत राहणार आहे. औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांवर पुढील ३ महिने स्थीर आकार लागू होणार नाही. कृषी ग्राहकांना कोणतीही वीज दरवाढ करण्यात आलेली नाही. सोलर रूफ टॉप वापरणाऱ्‍या ग्राहकांना कोणताही अतिरिक्त भार नाही. या कोरोना संकटाच्या महामारीत राज्यभरातील लाखो ग्राहकांना काँग्रेसकडून एक थेट मदत करण्यात आली असल्याचे दिसून येत आहे. राज्यातल्या उद्योग वृद्धीसाठी मराठवाडा व विदर्भासाठी देण्यात आलेला सब्सिडीचा कॅप वाढविण्यासाठी तसेच उर्वरित महाराष्ट्रासाठी देखिल पॅकेज देण्याबद्दल प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ग्राहकाशी थेट संपर्क होऊ नये, याकरिता मिटर रिडींग, वीजबिल वितरीत करणे, वीज बिल भरणा केंद्र, वीज चोरी मोहिम, वीजपुरवठा खंडित करणे इत्यादी प्रक्रिया थांबविण्यात आल्या आहेत. कोरोना विरोधी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून या कक्षाच्या माध्यमातून प्रत्येक राज्यातील मजूर, कामगार महाराष्ट्रात अडकले आहेत अशा लोकांना मदत करण्यासंदर्भात सुचना मिळताच परराज्यातील १ लाख १० हजार कामगारांना काँग्रेसने मदत केली आहे.

औषधे, सॅनिटायझर, मास्क, साबण व गरजेच्या वैद्यकीय साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. तसेच २० हजारांहून अधिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी रक्तदान केले आहे. एकप्रकारे या संकटात काँग्रेसने राज्यातील नागरिकांसह प्रशासनाला सर्वोतोपरी मदत केली असून यापुढे ही मदत करण्याचा संकल्प केला असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

Exit mobile version