Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वीजचोरी करणाऱ्यांवर महावितरणची धडक कारवाई

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहर व ग्रामीण भागात मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध सावदा उपविभागाने धडक कारवाई सुरु केली आहे. मागील आठवड्यापासून असे ३६ मीटर महावितरणने जप्त केले, तसेच विविध कलमान्वये ४४ वीजचोरांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली.यामुळे विजचोरांचे धाबे दणाणले आहे.

मुख्य कार्यालयाने राबवलेल्या धोरणानुसार ज्या वीजवाहिनीवर जास्त वीजगळती होत आहे. अश्या विजवाहिनीवर वीजगळती कमी करण्यासाठी सावदा विभागाचे कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांच्या आदेशानुसार व उपकार्यकारी अभियंता राजेश नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वीज चोरी करणाऱ्यांविरुद्ध मोहीम उघडण्यात आली आहे. या मोहिमेत प्रामुख्यात ० ते ५० युनिट वापर असणाऱ्या २३० ग्राहकांच्या मीटरची कसून तपासणी करण्यात आली. त्यात फेरफार असलेले ३६ मीटर जप्त करून वीज जोडणी कापण्यात आली आहे.

अशी केली तपासणी
विद्युत कायद्यानुसार शेजाऱ्यांकडून अनधिकृतपणे वीज घेणे, मंजूर भारापेक्षा अधिक क्षमतेच्या भाराचा वापर करणे, मंजूर वर्गवारीतून दुसऱ्या वर्गवारीसाठी अनधिकृत विजेचा वापर करणे, मीटरची छेडछाड करणे, आकोडा टाकून वीज घेणे, सर्विस वायर बायपास करणे आदींचा समावेश होता. तसेच कोणीही मीटरमध्ये छेडछाड करू नये, आकोडे टाकून विजेचा वापर करू नये, मंजूर भारापेक्षा अधिक भाराने विजेचा वापर करू नये, व इतर वर्गवारीसाठी वापर करू नये. अनधिकृत विजेचा वापर करतांना आढळून आलेल्या ग्राहकंवर विद्युत कायद्यानुसार कडक कारवाई करण्याचे आदेश उपकार्यकारी अभियंता राजेश नेमाडे यांनी महावितरणच्या कर्मचार्यांना दिले आहे.

वीजचोरांवर कारवाईचा तपशील
ज्या ग्राहकांची वीज जोडणी कापण्यात आली आहे त्यात सावदा शहर ८ ,चिनावल ७, बलवाडी ६, निंभोरा ४ , कळमोदा ४ , रायपुर ४, मस्कावद सिम ४, रोझोदा ३, दसनूर २,व कोचुर, मोठा वाघोदा, येथील प्रत्येकी एका ग्राहकचा समावेश आहे. या मोहिमेत सहाय्यक अभियंता विशाल किनगे, योजना चौधरी,हेमंत चौधरी, सागर डोळे, योगेश चौधरी, मंगेश यादव, सचिन गुळवे, प्रसन्ना साळुंके , भूषण पाटील आदी अभियंता व वीज कर्मचारी यांचा समावेश होता.

Exit mobile version