Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विस्तारवादा विश्वाच्या शांततेसाठी धोका : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) विस्तारवादाचा काळ संपला असून आता विकासवादाचा काळ आहे. वेगाने बदलत्या काळात विकासवादच गरजेचा आहे. मागील शतकात विस्तारवादानेच मनुष्यजातीचा विनाश केला. एखादा जर विस्तारवादाच्या हट्टाने पेटला तर हा विश्वाच्या शांततेसाठी धोका आहे. इतिहास साक्षीदार आहे की, अशी ताकद कायमच मिटून जाते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखच्या सीमेवर तैनात भारतीय सैन्याशी संवाद साधला.

 

यावेळी मोदी म्हणाले की, तुमचे साहस या हिमालयाच्या उंचीपेक्षाही मोठं आहे. तुमच्या शौर्यामुळे आज जगाला भारताकडून योग्य संदेश गेला आहे. तुमचे धैर्य जगाने पाहिले आहे. तुमच्या त्यागामुळेच आज आत्मनिर्भर भारताचे स्वप्न आम्ही पाहात आहोत. शांतता ही प्रगती आणि स्थैर्यासाठी गरजेची आहे. मात्र, दुबळेपणा हा शांतता आणू शकत नाही. त्यासाठी वीरतेचीच गरज असते. त्यामुळे वीरांनी शौर्य गाजवून आपल्या भूमीचे रक्षण करायचे असते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. इतिहास साक्षी आहे की विस्तारवाद करण्याचा प्रयत्न करणारे नेहमीच नष्ट झाले आहेत किंवा झुकले आहेत. याच अनुभवातून आताही संपूर्ण जगाने या विस्तारवादाच्या विरोधात एक होण्याचा निर्णय घेतला आहे. आज जग विकासवादासोबत आहे आणि खुल्या विकासाचे जग स्वागत करत आहे. देशवासियांना देशाच्या जवानांच्या पराक्रमाचा अभिमान आहे. आज मी माझ्या वाणीतून आपला जयघोष करतोय, गलवान घाटीत शहीद झालेल्या देशातील जवानांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. देशाच्या कानाकोपऱ्यातून भारतीय जवान आपलं शौर्य दाखवत आहेत. आज प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुगली आहे, देशवासियांनी आपल्यासमोर नतमस्तक केलंय. गलवान खोऱ्यातील नदी, पर्वत, खोऱ्यातील कानाकोपरा देशातील जवानांच्या पराक्रमाची गाथा गात आहे. देशातील 130 कोटी भारतीयांच्या सन्मानाचा हा पराक्रम आहे, देशासाठी बलिदान देणाऱ्या राष्ट्रभक्तांची ही भूमी आहे. तुमचे बाहू इथल्या पर्वतरांगांसारखेच बळकट आहे. तुमची इच्छाशक्तीही अटळ आहे, मी हा सगळा अनुभव घेतो आहे. त्याचंच प्रतिबिंब माझ्या भाषणात शब्दरुपाने उतरले आहे असे म्हणत त्यांनी जवानांचे मनोबल बाढवण्याचा प्रयत्न केला, असल्याचे देखील पंतप्रधान मोदी म्हणाले.

Exit mobile version