Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विश्वासघातामुळेच आम्ही विरोधक झालो — चंद्रकांत पाटील

 

 

पुणे : वृत्तसंस्था । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा सत्तेत न आल्याची सल बोलून दाखवली आहे. जनतेने आम्हाला राज्यकर्ते म्हणून निवडून दिलं. पण विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोविड सेंटरला चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. कोविडचा काळ आहे. कोरोनाचं प्रमाण वाढत आहे. रेमडेसिवीरचा विषय आता नियंत्रणात आहे. ऑक्सिजनचा विषयही नियंत्रणात येत आहे. कोरोनाच्या या वातावरणात राजकारण करणं योग्य नाही. मात्र, कोविड आहे काय हवं ते करून घ्या, असंही करून चालणार नाही. शेवटी लोकांनी आम्हाला अंकूश शक्ती म्हणून निवडून दिलं आहे. आम्हाला राज्यकर्ते म्हणूनच निवडून दिलं होतं. विश्वासघात जाला आणि आम्ही विरोधक झालो. विरोधकांची भूमिका ही अंकूश शक्ती असते. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही घटना आम्ही खपवून घेणार नाही, असं पाटील म्हणाले.

 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावरील धाड हा सीबीआयचा दुरुपयोग असल्याच्या सत्ताधाऱ्यांच्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. सीबीआयचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप केला जात आहे. कोर्टानेच चौकशी लावली आहे. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे का? असेल तर मग उद्याच कोर्टात अवमानना याचिका दाखल करतो, असा इशारा देतानाच लोकांना उल्लू बनवण्याचं काम सुरू आहे. कोर्टाने केवल चौकशीचे आदेश दिल्याचं सांगितलं जात आहे. माझ्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे. त्यात शेवटच्या पॅऱ्यात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश आहेत. यात सत्तेचा दुरुपयोग आला कुठे?, असा सवाल त्यांनी केला.

 

सुप्रीम कोर्टाने मोदींना फटकारले की बघा कोर्टाने केंद्राला फटकारले, असं संजय राऊत सांगतात, पण महाराष्ट्राला फटकारले की ते मॅनेज असल्याचा आरोप ते करतात, असा टोलाही त्यांनी लगावला. पश्चिम बंगालमध्ये 200 हून अधिक जागा मिळणार आणि पंढरपूर जिंकणार असा दावाही त्यांनी केला. आमचा विजय झाला की ईव्हीएम घोटाळा असतो. त्यांचा विजय झाला की सारं काही अलबेल असतं, असा चिमटाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना काढला. केजरीवाल- मोदी वादावरून लक्ष हटवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाल्याच्या वृत्तावर अशी टीका करणाऱ्यांची कीव येते असे ते म्हणाले.

 

चंद्रकांत पाटील यांनी कोविड सेंटरची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी रुग्णवाहिकांचं लोकार्पणही केलं. या दोन्ही कार्यक्रमांना मोठी गर्दी झाली होती. लोक एकमेकांना खेटून उभे होते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. मुंबई-पुण्यात कोरोनाचा कहर निर्माण झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी कडक निर्बंध लागलेले असताना राजकारण्यांना भरगच्च कार्यक्रम करण्यासाठी वेगळे नियम आहेत का? असा सवाल या कार्यक्रमाच्या निमित्ताने विचारला जात आहे.

Exit mobile version