Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विशेष शिक्षकांना नियमित पदावर समायोजित करण्यासाठी आमरण उपोषण (व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी । खासगी अनुदानित शाळेतील तीन शिक्षकांनी थकित वेतन अदा करावे व नियमित वेतन मिळावे या मागणीसाठी मंगळवारी ४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता जळगाव जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे.

 

गणेश लिंगायत रा. धरणगाव, दिनेश पाटील रा. एरंडोल आणि सोनाली पिंगळे रा. अमळनेर या तीन शिक्षकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २००९ पासून खासगी विना अनुदानित शाळेत विशेष शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. शासनाच्या धोरणामुळे अतिरिक्त शिक्षक झाले. विशेष शिक्षक या पदावरून अतिरिक्त घोषित करून नियमित शिक्षक पदावर समायोजन करावे, थकित वेतन अदा करावे व नियमित वेतन मिळावे यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यासंदर्भात उच्च न्यायालयाने ११ जुलै २०१८ रोजी निकाल देवून नियमित शिक्षक पदावर समायोजन देवून सर्व मागण्या मान्य केल्या होत्या.

परंतू प्रशासनाने उच्च न्यायालयाचा आदेशाचा अवमान करून नियमित शिक्षक पदावर समायोजन न करता १० डिसेंबर २०२० रोजी गटस्तरावर नियुक्तीचे आदेश काढून शिक्षकाचे समायोजन करण्यात आले. नियुक्तीचे आदेश होवून चार महिने झाले तरी देखील कोणत्या प्रकारचे वेतन देण्यात आलेले नाही. याबबात वेळीवेळी कार्यालयाशी संपर्क व पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष भेटून वेतनाची मागणी केली असता अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली आहे. फसवणूक झाल्याबाबत पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दिली होती. तेथेही न्याय न मिळाल्याने आमच्या कुटुंबियावर उपासपारीची वेळ आली आहे. त्यामुळे तिनही शिक्षकांनी मंगळवारी ४ जानेवारी रोजी जळगाव जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. या निवेदनावर गणेश लिंगायत रा. धरणगाव, दिनेश पाटील रा. एरंडोल आणि सोनाली पिंगळे रा. अमळनेर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

Exit mobile version