Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विरोधी पक्षाकडून जनतेची दिशाभूल”; अन्वय नाईक कुटुंबीयांची पत्रकार परिषद

 

मुंबई : वृत्तसंस्था । अन्वय नाईक कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षाकडून जनतेची  दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरुन गदारोळ घालण्यात आल्यानंतर सत्ताधारी नेत्यांकडून अन्वय नाईक प्रकऱणाचा उल्लेख करण्यात आला. यामुळे पुन्हा एकदा अन्वय नाईक प्रकरण चर्चेत आलं असून फडणवीसांनी अन्वय नाईक प्रकरण दाबलं असा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. यानंतर फडणवीसांनी सुप्रीम कोर्टाचा दाखला देत गृहमंत्र्यांविरोधात हक्कभंग दाखल केला आहे. 

फक्त श्रीमंतानाच न्याय मिळणार का? अशी विचारणा अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईकने केली. “सुप्रीम कोर्टाचा निकाल नाही तर फक्त जामीन दिला आहे. लोकांची दिशाभूल करण्यात येत असून आमचा लढा अद्याप सुरु आहे,” असं सांगत यावेळी त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला,  मुंबई पोलिसांच्या तोंडाला काळं फासलं असं म्हणणं योग्य वाटतं का? अशीदेखील विचारणा केली.

आम्हाला ज्या धमक्या येत आहेत त्याचं काहीच नाही का? आम्हाला अद्यापही धमक्या दिल्या जात आहेत असं अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी सांगितलं. “अर्णब गोस्वामी जेलमधून बाहेर पडल्यावर सर्वांसमोर धमकी देत होता, आम्हाला दोन दिवस झोप लागली नाही,” असं त्या म्हणाल्या. आमची केस दाबली गेली असून त्याची चौकशी करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

“आमच्यावर हात टाकण्यात आला होता. तेव्हाच्या तपास अधिकाऱ्याला कोणाचा आदेश होता हेदेखील बाहेर काढावं. मी आणि आई मनाचं काही सांगत नाही आहोत. आम्ही संशय व्यक्त करत नसून सुसाईड नोटमध्ये नाव देण्यात आलं आहे. तपास अधिकाऱ्याला आमची चौकशी करण्याचा आदेश कोणी दिला होता? ज्यांना समस्या आहे त्यांनी चर्चेला बसावं.. चाय पे चर्चा होऊन जाऊ द्या,” असं आव्हान यावेळी आज्ञा नाईकने दिलं. किरीट सोमय्यांचा जीव वर खाली का होतो? असा सवालही  विचारला.

अक्षता नाईक आणि आज्ञा नाईक यांनी यावेळी महाराष्ट्र पोलिसांचा आपल्याला अभिमान असल्याचं सांगितलं. गरज लागल्यास मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ अशी माहिती दिली.

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना अन्वय नाईक प्रकरण दाबण्यात आलं, असा आरोप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी मंगळवारी विधानसभेत केला. यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील उत्तर देत, माझी खुशाल चौकशी करा, माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे. तुमच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही असं म्हटलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अन्वय नाईक प्रकरणात काल काही आरोप केले होते. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात स्वयंस्पष्ट अभिप्राय नोंदवले आहेत. त्यामुळे त्यांनी खोटे आरोप करून सुप्रीम कोर्टाचा सुद्धा अवमान केला आहे. प्रथमदर्शनी या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा प्रकार दिसून येत नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा अभिप्राय आहे. त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. शिवाय ही बाब आपण काल निदर्शनास आणून दिल्यानंतर सुद्धा ते वारंवार तेच बोलत राहिले. असे करून अनिल देशमुख यांनी माझ्या बोलण्यावर बंधने आणून माझा विशेषाधिकार भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करावी, अशी मागणी मी सभागृहात केली आहे”.

Exit mobile version