Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विरोधकांवर टीका करीत मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांचे कौतुक

मुंबई: वृत्तसंस्था| काही लोकांनी पोलिसांच्या बदनामीचा प्रयत्न केला. आता त्यांची तोंडं बंद आहेत. पोलिसांचं कर्तृत्व सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. त्याला तोड नाही.कोणी कितीही आदळआपट केली तरी ते पोलिसांच्या कर्तृत्वाला डाग लावू शकणार नाहीत,’ असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विरोधकांना टोला हाणला.

नववर्षाच्या निमित्तानं मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयात जाऊन पोलिसांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ‘पोलीस दक्ष राहतात. काम करतात म्हणून आम्ही सण साजरे करू शकतो. या जाणिवेतून मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर एक नागरिक म्हणून पोलिसांचे आभार मानायला आलो आहे,’ असं मुख्यमंत्री म्हणाले.

‘पोलिसांना अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्यांचा प्रत्येक क्षण तणावात जातो. कोरोनाच्या काळात काही पोलीस शहीद झाले. काही हजार पोलिसांना कोरोनानं ग्रासलं. पण पोलीस दल काम करत राहिलं. त्यांना कुटुंब नव्हतं का? पोलिसांनी तेव्हा ‘वर्क फ्रॉम होम’ केलं असतं तर काय झालं असतं?,’ असा सवाल करत, मुख्यमंत्र्यांनी पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक केलं.

कोरोनाचं संकट अजूनही गेलेलं नाही. इतर देशांमध्ये हा धोका आणखी वाढला आहे, त्यामुळं जर सर्व उघडलं तर ते चुकीचं ठरेल. पोलिसांवरही विनाकारण ताण येईल,’ असं ते म्हणाले.

Exit mobile version