Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विरोधकांना मराठा आरक्षणाचे राजकारण करायचे आहे – शरद पवार

मुंबई वृत्तसंस्था । ‘मराठा आरक्षण प्रश्नावर आम्हाला राजकारण करायचं नाही असं सांगताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यादेश काढला तर आंदोलन होणार नाही असं मत व्यक्त केलं. मराठा आरक्षण प्रश्नावर विरोधकांना राजकारण करायचं आहे अशी टीकाही शरद पवार यांनी केली आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“मला जिथपर्यंत कायदा कळतो त्याप्रमाणे मराठा आरक्षणा संदर्भात अध्यादेश आणू शकतो. फेरविचार याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. आम्हाला मराठा आरक्षण प्रकरणी राजकारण करायचं नाही तर विद्यार्थ्यांना दिलासा द्यायचा आहे. काहींना मराठा समाजात प्रक्षोभ वाढावा असं वाटत असेल,” अशी टीकाही त्यांनी केली. मराठा आरक्षणावरुन केंद्र-राज्य असा वाद नको असं आवाहन करताना मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असं यावेळी त्यांनी सांगितलं.

कंगना प्रकरणाशी सरकारचा संबंध नसल्याचं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं. “कंगना प्रकरणाचा सरकारशी काही संबंध नाही. कार्यालयावर कारवाई मुंबई पालिकेने केली आहे. पालिकेचे काही नियम असून त्यानुसार ते कारवाई करत असतात. कारवाईचा निर्णय सरकारचा नाही तर पालिकेचा आहे. सर्व जबाबदारी पालिकेची आहे,” असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.

Exit mobile version