Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विमा पॉलिसीज कायम उपलब्ध करून देण्याचा नियामक प्राधिकरणाचा विचार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था,/ कोरोना विषाणूची लागण झाल्यास त्यावरील उपचारांसाठी आर्थिक पाठबळ असावे, यासाठी विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (इरडा) सर्व विमा कंपन्यांना कोरोना कवच व कोरोना रक्षक पॉलिसी बाजारात आणण्यास सांगितले होते. सरकारी व खासगी सर्वसाधारण विमा कंपन्यांनी तशा पॉलिसी बाजारात सध्या आणल्या आहेत. या पॉलिसी विशेष बाब म्हणून जनतेला उपलब्ध करून दिल्या गेल्या. परंतु सातत्याने वाढता संसर्ग पाहता, या दोन्ही पॉलिसी नियमित विमा पॉलिसी म्हणून करण्याचा व त्याद्वारे या पॉलिसी कायमस्वरूपी जनतेला उपलब्ध करून देण्याचा विचार इरडा करत आहे. ही माहिती इरडाचे सदस्य टी. एल. अलमेलू यांनी दिली आहे.

टी. एल. अलमेलू म्हणाल्या, कवच व रक्षक या दोन्ही पॉलिसीत काही बदल करावे लागणार आहेत. या विषाणूचा परिणाम दीर्घकाळ राहणार असल्याने या बदलांवर लवकरात लवकर विचार करून या दोन्ही पॉलिसी नियमित करण्यासाठी त्यांना अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. सध्या उपलब्ध असलेल्या या दोन्ही पॉलिसींची वैधता मार्च २०२१ पर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. दोन्ही पॉलिसींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि सूचना जारी केल्या जातील

या साथीमुळे आरोग्यविमा क्षेत्राची वाढ झपाट्याने होत आहे. यामुळे आरोग्यविमा क्षेत्राचा हिस्सा मार्च ते जुलै या कालावधीत २७ टक्क्यांवरून ३० टक्क्यांवर गेला आहे. आता या पॉलिसी प्रत्यक्ष विकणे किंवा खरेदी करणे शक्य होत नसल्यास त्या डिजिटल मंचावर कशा उपलब्ध करून देता येतील, यावर इरडा विचार करत आहे. यामुळे संपूर्ण आरोग्यविमा क्षेत्राचे स्वरूप बदलणार आहे.

पॉलिसीधारकांना त्यांनी पूर्वी खरेदी केलेल्या पॉलिसींखरेजी या पॉलिसी खरेदी करण्याची मुभा देण्यात आली आहे. या दोन्ही पॉलिसी अल्पावधीत लोकप्रिय झाल्या असल्याचा दावाही अलमेलू यांनी केला. जुलैमध्ये बाजारात आल्यापासून दर आठवड्याला कवच पॉलिसीच्या विक्रीमध्ये १५ टक्के वाढ दिसून आली आहे. बहुतांश पॉलिसीधारकांनी साडेनऊ महिन्यांसाठीच्या करोना कवच पॉलिसीची निवड केली आहे. या दोन्ही पॉलिसीअंतर्गत १५ लाख लोकांना विमा संरक्षण देण्यात आले आहे

Exit mobile version