Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विमानाने प्रवास करून चोऱ्या करणाऱ्या चोरांना पकडले

 

बेंगळुरू:  वृत्तसंस्था ।  पोलिसांच्या चातुर्यलक्षण आणि सुक्ष्म निरीक्षण कौशल्याने  विमानाने प्रवास करून चोऱ्या करणाऱ्या चोरांचा  छडा लागला आहे. संशयिताच्या शेंडीवरून सोनसाखळी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात बेंगळुरू पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी टोळीतील सहा जणांना अटक केली आहे.

 

कॉन्स्टेबल लमानी आणि देवराजिया यांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बैठकीसाठी बोलावलं होतं. त्या बैठकीत सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आले होते. त्यात सोनसाखळी चोरटे दिसत होते. ते सीसीटीव्ही फुटेज पाहून दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. दोघेही एकमेकांकडे बघत राहिले. कारण त्या संशयितांपैकी एकाची शेंडी होती आणि त्याला बैठकीच्या काही तास आधीच एका चहाच्या टपरीवर या दोघांनी पाहिले होते.

 

 

सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर पोलिसांनी वेळ न दवडता तात्काळ कारवाई करून आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या आवळल्या. ते दिल्लीला विमानाने जाण्याआधीच त्यांना पकडले. त्यांच्याकडून चोरीच्या ६ सोनसाखळ्या जप्त केल्या. त्यांची किंमत जवळपास १० लाख रुपये इतकी आहे. ‘पोलीस कर्मचाऱ्यांनी संशयिताला शेंडीवरून ओळखले नसते तर, कदाचित ते पुन्हा पळून जाण्यात यशस्वी झाले असते,’ असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या टोळीच्या मुसक्या आवळल्याने सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

 

 

बेंगळुरू पोलीस दलातील लमानी आणि देवराजिया यांना बैठकीसाठी बोलावले होते. कन्नमंगला येथे जात असताना त्यांनी एका चहाच्या टपरीवर काही लोक दिसले होते. त्यातील एकाला शेंडीवरून दोघांनी ओळखले. त्यानंतर पोलीस पथक तात्काळ त्या चहाच्या टपरीवर पोहोचले. ते राहत असलेले ठिकाण त्या चहाविक्रेत्याने सांगितले. पोलिसांनी तिथे जाऊन सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडे हवाई प्रवासाची तिकीटे आढळली. दोन मुख्य संशयित केम्पेगौडा विमानतळावरून विमानाने दिल्लीला जाणार होते. आणखी काही जणांना लुटण्याचा त्यांचा कट होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

 

सुरेश कुमार उर्फ पंडित उर्फ सुभाष, हसीन खान, ए. इर्शाद, एम. सलीम, एम अफरोज उर्फ शाहीद (सर्व राहणार दिल्ली) आणि हारिस पीके उर्फ हारिस (वायनाड, केरळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सुरेश आणि हसीन यांच्याविरोधात आधीच २४ गुन्हे दाखल आहेत.

 

Exit mobile version