Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस नेत्यांची मोर्चेबांधणी

मुंबई : वृत्तसंस्था । काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या गळ्यात पडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले. मात्र, आता पटोलेंच्या विधानसभा अध्यक्षपदाची जागा घेण्यासाठी काँग्रेसमध्ये चढाओढ लागली आहे.

पश्चिम महाराष्ट्रापासून ते मराठवाड्यापर्यंत त्यासाठी लॉबिंग सुरु झाली आहे. ‘एक व्यक्ती एक पद’चा पुरस्कार करुन नव्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची मागणी राज्यातील काही नेत्यांनी केली. नव्या प्रदेशाध्यक्षाच्या निवडीसाठी केंद्रीय पातळीवर तयारीही सुरु झाली. त्यांनतर विद्यमान विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे.

ही निवड झाल्यानंतर नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्षपद सोडावे लागणार आहे. याच शक्यतेला समोर ठेवून नाना पटोलेंची जागा घेण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चुरस सुरु आहे. त्यासाठी आपापल्या पातलीवर लॉबिंगही सुरु झालं आहे. मराठवाड्यातील आमदार सुरेश वरपुडकर यांच्यापासून ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत असे अनेक नेते विधानसभा अध्यक्षपदासाठी उत्सुक असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने एच. के. पाटील यांना राज्याचे प्रभारी नेमल्यानंतर पक्षामध्ये अनेक बदल करण्यात आले. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन पक्षामध्ये फेरनिवडी करण्यात आल्या. महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी संध्या सव्वालाखे आणि मुंबईच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड करण्यात आली. आमदार संग्राम थोपटे, आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांची नावं विधानसभा अध्यक्षपदाच्या चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा विधानसभा अध्यक्षपदासाठी झाली होती. मात्र, त्यांच्या नावाला त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोध झाला. विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

दरम्यान, वेगवेगळ्या काँग्रेस नेत्यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी लॉबिंग सुरु केले असले तरी हायकमांडकूडन येणारे आदेशच निर्णायक ठरणार असल्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर कोण बसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे

Exit mobile version