Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यार्थ्यांची दहशतवादी कारवायासाठी भरती; एनआयएचा ठपका

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भीमा-कोरेगाव हिंसाचारात एल्गार परिषदेच्या २२ सदस्यांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने ( एनआयए ) आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपींनी महत्त्वाच्या विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र आणि देशात दहशतवादी कारवायासाठी नेमलं होतं असा ठपका आरोपपत्रात ठेवला आहे.

 

भीमा कोरेगाव हिंसाचाराशी संबंधित एल्गार परिषद आरोपपत्रामध्ये एनआयएने दिल्लीच्या जेएनयू तसेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस) च्या विद्यार्थ्यांना दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी नेमलं होतं असे म्हटले आहे.

 

चार वर्षांपासून भारतीय राजकारणाला हादरवून टाकणाऱ्या प्रकरणांच्या संदर्भात अटक केलेल्या १६ आरोपी आणि इतर सहा फरार व्यक्तीविरोधात दाखल करण्यात आलेल्या दुहेरी खटल्यांमध्ये एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात हा दावा केला आहे.

 

 

प्रदीर्घ तपासानंतर, एनआयएच्या विशेष न्यायालयाचे विशेष न्यायाधीश डी.ई. कोथळीकर यांच्यासमोर गेल्या आठवड्यात मसुदा आरोपपत्र दाखल करण्यात आले. एनआयएच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी दहशतवादी कारवायांसाठी दोन प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (नवी दिल्ली) आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (मुंबई) यासह विविध विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी नेमलं होतं असा ठपका ठेवला आहे.

 

आरोपींनी केंद्र आणि महाराष्ट्र सरकारविरोधात युद्ध करण्याचा कट रचला होता. नेपाळ आणि मणिपूरमधून एम -४ (अत्याधुनिक शस्त्र) च्या ४,००,००० फेऱ्या आणि इतर शस्त्रास्त्रांच्या वार्षिक पुरवठ्यासाठी ८ कोटी रुपयांचे नियोजन करण्याचे षडयंत्र रचले असे एनआयएने म्हटले आहे.

 

सुधीर पी. ढवळे, वेर्नन एस. गोन्साल्विस, अरुण टी. फरेरा, रोना जे. विल्सन आणि गौतम नवलखा, सुरेंद्र पी. गडलिंग, शोमा के. सेन, महेश एस. राऊत, पी. वरवरा राव, सुधा भारद्वाज, आनंद बी. तेलतुंबडे, हनी बाबू एम. थरायल, सागर गोरखा, रमेश गायचोर यांना अटक करण्यात आली आहे. दिवंगत स्टॅन स्वामी यांचा ५ जुलै रोजी मुंबईतील कोठडीत मृत्यू झाला.

 

Exit mobile version