Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यापीठ, महाविद्यालयांमधील अध्यापनाचे कामकाज उद्यापासून ३१ मार्चपर्यत बंद

जळगाव, प्रतिनिधी । कोरोना विषाणू (कोव्हीड-१९)चा होणारा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून राज्य शासनाच्या निर्देशानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सर्व शैक्षणिक प्रशाळा व संलग्न महाविद्यालयांमधील अध्यापनाचे कामकाज उद्या सोमवार १६ मार्च ते ३१ मार्च या कालावधीपर्यंत बंद राहणार आहे.

विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही पवार यांनी रविवार परिपत्रक जारी केले आहे.यात म्हटले आहे की कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी, खासगी शाळा व महाविद्यालये ३१ मार्च पर्यत बंद ठेवण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत.त्या अनुषंगाने विद्यापीठ आणि संलग्नित सर्व महाविद्यालयातील अध्यापनाचे कामकाज ३१ मार्च पर्यंत बंद राहणार असून विद्यार्थ्यांनी वर्गास उपस्थित राहू नये. तथापि इतर शैक्षणिक कामकाज सुरू राहणार असल्याने विद्यापीठ व महाविद्यालयांतील सर्व शिक्षक, अधिकारी,कर्मचारी यांनी नेहमीप्रमाणे कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे. या कालावधीत विद्यापीठाच्या असलेल्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा मात्र वेळापत्रकानुसार सुरू राहतील. वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सुरक्षितते संदर्भात आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी.या काळात परीक्षा नसेल असे विद्यार्थी वसतिगृह अधिक्षकांच्या अनुमतीने आपल्या मुळ गावी जाऊ शकतात. आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाही यासाठी आवश्यक ती दक्षता प्राचार्य, संचालक व विभागप्रमुख यांनी घ्यावी तसेच विद्यापीठ व महाविद्यालयातील व्यायामशाळा(जिम), जलतरण तलाव या कालावधीत बंद ठेवावे असे या परिपत्रकात विद्यापीठाने म्हटले आहे.

Exit mobile version