Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यापीठात विविध पदवी अभ्यासक्रम येत्या नव्या शैक्षणिक वर्षापासून सुरु होणार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ४ प्रशाळांमध्ये ४ वर्षीय विविध पदवी अभ्यासक्रम येत्या नव्या शैक्षणिक वर्षापासून सुरु होणार आहेत अशी माहिती कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी दिली.

 

या नवीन अभ्यासक्रमांतर्गत मेजर आणि मायनरसह सामाजिकशास्त्रे प्रशाळे मध्ये बी.ए.(सोशल सायन्स), व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेत बी.बी.ए.(मॅनेजमेंट), गणितशास्त्र प्रशाळेत बी.एस्सी. (मॅथेमॅटीक्स) आणि संगणकशास्त्र प्रशाळेत बी.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) यांचा समावेश आहे.  बी.ए.  सोशल  सायन्सेस मध्ये मेजर साठी अर्थशास्त्र किंवा राज्यशास्त्र आणि मायनरसाठी मॅनेजमेंट किंवा स्टॅटीस्टीक्स, बी.बी.ए. (मॅनेजमेंट) मध्ये मेजर साठी मार्केटींग किंवा एच.आर.एम. किंवा फायनान्स आणि मायनरसाठी डाटा सायन्स किंवा इकॉनॉमिक्स तसेच बी.एस्सी. (मॅथेमॅटीक्स) मध्ये मेजरसाठी ॲक्युरीअल सायन्स किेंवा अप्लाईड स्टॅटीस्टीक्स आणि मायनरसाठी इकॉनॉमिक्स किंवा डाटा सायन्स व बी.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) मध्ये मेजरसाठी डाटा सायन्स किंवा माहिती तंत्रज्ञान आणि मायनरसाठी मॅथेमॅटीक्स किंवा डीजीटल इलेक्ट्रॉनिक्स हे उपलब्ध पर्याय राहतील.

 

हे सर्व पदवी अभ्यासक्रम एकाधिक प्रवेश व एकाधिक निर्गमन या पर्यायांसह उपलब्ध  असतील. पहिल्या वर्षानंतर जर विद्यार्थी बाहेर पडला तर त्याला त्या विषयातील  प्रमाणपत्र मिळेल. दोन वर्षानंतर बाहेर पडला तर पदविका प्रमाणपत्र मिळेल. तीन वर्ष पूर्ण करुन बाहेर पडला तर पदवी आणि चार वर्ष पूर्ण केल्यानंतर ऑनर्स पदवी ही मेजर आणि मायनरसह मिळेल. या नव्या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी तर मिळेलच मात्र विविध पर्यायी आणि  कौशल्य संवर्धनाचे अभ्यासक्रम शिकता येतील. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने तयार केलेल्या या अभ्यासक्रमांच्या रचनेमुळे बहुविद्याशाखीय दृष्टीकोन,  ओपन इलेक्टीव्ह, मूल्यवर्धित अभ्यासक्रम,  क्षमतावर्धित अभ्यासक्रम, जीवनकौशल्य अभ्यासक्रम आणि व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रम या सहा तत्वांचे पालन होणार आहे.

 

नवीन शैक्षणिक वर्षापासून हे अभ्यासक्रम विद्यापीठाच्या प्रशाळेत सुरु होणार असून याबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

Exit mobile version