विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत बैकीचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या राज्यातील अंमलबजावणीच्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेल्या सुकाणू समिती समवेत राज्यातील सर्व विद्यापीठाचे प्र-कुलगुरूंची बैठक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात २७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.

 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने विविध समित्या आणि उपसमित्या स्थापन केल्या आहेत. या अंमलबजावणीच्या अनुषंगाने गठीत उपसमितीच्या अहवालातील शिफारसीच्या अंमलबजावणी संदर्भात आढावा घेवून येणा-या अडचणी निवारणासाठी उपाययोजना सुचवाव्यात व मार्गदर्शन करावे यासाठी सुकाणू समिती गठीत केली आहे. या सुकाणू समितीची सर्व प्र-कुलगुरूंसमवेत बैठक सोमवार दि. २७ फेब्रुवारी रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर हे सुकाणू समितीचे अध्यक्ष आहेत. तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन, मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू प्रा.आर. डी. कुलकर्णी, नाशिक येथील उद्योजक महेश दाबके, अमरावती येथील डॉ. प्रशांत मगर, मुंबई विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे, प्राचार्य अनिल राव, मुंबई येथील डॉ. माधव वेलिंग, सोमय्या विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एन. राजशेखरन पिल्लई हे सुकाणू समितीचे सदस्य आहेत.

 

२७ रोजी महाराष्ट्राच्या सर्व अकृषी विद्यापीठातील प्र-कुलगुरू समवेत ही सुकाणू समिती चर्चा करणार आहे. महाविद्यालय आणि विद्यापीठातील विभाग यांच्यासाठी विद्यापीठानी तयार केलेल्या प्रारूप आराखडावर या बैठकीत चर्चा होईल. यावेळी उच्च शिक्षण संचालनालयाचे अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. प्र-कुलगुरू समवेत चर्चा झाल्यानंतर २८ रोजी फक्त सुकाणू समितीची बैठक होईल अशी माहिती प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे व समन्वयक तथा वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे  अधिष्ठाता डॉ. अनिल डोंगरे यांनी दिली.

Protected Content