Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यापीठातील तत्कालीन वित्त अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा- देवेंद्र मराठे

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यामधील भोंगळ कारभार झाला असून भ्रष्टाचारी वित्त अधिकारी विवेक काटदरे यांनी आर्थिक गैरव्यवहार केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी मागणी केली आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यामधील भोंगळ कारभाराविषयी जळगाव जिल्हा एन एसयु आयच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी आवाज उठविला. तसेच विद्यापीठांमधील मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या आर्थिक गैरव्यवहार याविषयी देखील एनएसयुआय आक्रमक भूमिका घेतलेली होती राज्यपाल मुख्यमंत्री व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्याकडे देखील मोठ्या प्रमाणात तक्रारी एनएसयूआयच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या होत्या. त्या अनुषंगानेच केलेल्या पाठपुराव्याला यश आले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही व त्या अनुषंगानेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यामधील भ्रष्टाचारी वित्त अधिकारी विवेक काटदरे यांची गच्छंती होऊन त्या जागी प्रभारी अधिकारी म्हणून सोमनाथ गोहिल हे नियुक्त करण्यात आले.

परंतु जळगाव जिल्हा एन एस यू आय च्या वतीने आमची मागणी आहे की, आर्थिक गैरव्यवहार हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे, त्या अनुषंगाने तत्कालीन वित्त अधिकारी विवेक काटदरे यांच्या वरती आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करावा व त्यांना चौकशीसाठी बोलावले तर नक्कीच चौकशीदरम्यान या झालेल्या आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचारामध्ये अजून मोठमोठे विद्यापीठांमधील नावे बाहेर येतील. तसेच तत्कालीन वित्त अधिकारी यांच्याकडून मागील केलेल्या सर्व भ्रष्टाचाराची वसुली करूनच त्यांना सोडण्यात यावे अन्यथा जळगाव जिल्हा एनएसयूआयच्या वतीने तत्कालीन वित्त अधिकारी सह त्यांना पाठीशी घालणारे कुलगुरू डॉक्टर पी पी पाटील यांच्यावरती आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

Exit mobile version