Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यापीठाच्या वतीने आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य अनुदान वाटप

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आर्थिक दुर्बल घटक योजनेअंतर्गत पदवीस्तरावरील १२५८ आणि पदव्युत्तर स्तरावरील ५३६ विद्यार्थ्यांना एकूण ९१ लाख ८३ हजार रूपयांचे अर्थसहाय्य अनुदान वाटप करण्यात आले.

 

विद्यार्थी विकास कक्षाद्वारे प्रत्येकवर्षी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकास, सांस्कृतिक व कल्याण कार्यक्रमांची आखणी तसेच अर्थसहाय्य दिले जाते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षापासून अर्थसहाय्य अनुदान वाटप करता आले नाही. आता फेब्रुवारी, २०२२ पासुन ऑफलाईन वर्ग सुरु झाल्याने विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले. विद्यार्थी कक्ष समितीच्या बैठकीत प्राप्त अर्जांची छाननी करण्यात येवून पदवीस्तरावरील १२५८ व पदव्युत्तर स्तरावरील ५३६ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्याची शिफारस समितीने केली. पदवीस्तरावरील कला, वाणिज्य व विधी शाखेतील विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन हजार, बी.एस्सी., बी.बी.एम., बी.सी.ए., बी.एस.डब्ल्यु. व शिक्षणशास्त्र पदवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन हजार पाचशे रूपये, अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार तसेच कला, वाणिज्यच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रत्येकी चार हजार, विज्ञान व तंत्रज्ञानच्या विद्यार्थ्यांना पाच हजार पाचशे रूपये, शिक्षणशास्त्रच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार अनुदान दिले जाते. जे विद्यार्थी दिव्यांग आहेत अथवा ज्या विद्यार्थ्यांचे आई किंवा वडील मयत आहेत त्यांना अतिरिक्त तीन हजार अनुदान दिले जाते. पदवीस्तरावरील ५५९ आणि पदव्युत्तर स्तरावरील २४२ विद्यार्थ्यांना या अतिरिक्त अर्थ सहाय्य अनुदानाचा लाभ देण्यात आला.
विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक प्रा. सुनील कुलकर्णी, प्रा. एस.आर. चौधरी, प्रा. अनिल डोंगरे, प्रा. रत्नमाला बेंद्रे, प्रा. एच.एल. तिडके, प्रा. अजय पाटील,  डॉ. उज्वल पाटील, डॉ. पवन पाटील, डॉ. संजीव पाटील हे समितीच्या बैठकीला उपस्थित होते. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अर्थसहाय्याचा लाभ झाला. प्रा. सुनील कुलकर्णी यांच्यासह सहायक कुलसचिव एन.जी. पाटील, मच्छींद्र पाटील, संतोष माळी, जगदीश शिवदे, अनुराग महाजन, विलास माळी, चंदन मोरे यांनी परीश्रम घेतले.

Exit mobile version