Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यापीठाच्या प्लास्टिक मुक्त भारत उपक्रमात ९ हजार ९२० किलो कचरा गोळा

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत १ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत प्लास्टिक मुक्त भारत हा उपक्रम ११४ महाविद्यालयात राबविण्यात येऊन १९ हजार ९२० किलो प्लास्टीक कचरा गोळा करण्यात आला.

भारत सरकारच्या युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालय आणि रासेयो क्षेत्रिय संचालनालय, पुणे यांच्या सुचनेनुसार या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठ अधिक्षेत्रातील ११४ महाविद्यालयांनी या उपक्रमात सहभाग घेतला. १६६०० रासेयो स्वयंसेवकांनी या अभियानात १९ हजार ९२० किलो प्लास्टीक कचरा गोळा करुन त्या त्या भागातील महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्या कडे देण्यात आला. हे प्लास्टीक विविध बसस्थानक, रेल्वेस्थानक, मंदिर परीसर, महाविद्यालय व विद्यापीठ परिसर, उद्यान, आदी सार्वजनिक स्थळांवरुन स्वयंसेवकांनी गोळा केला. हे अभियान राबवितांनाच स्वयंसेवकांनी गावाची स्वच्छता करुन नागरिकांमध्ये जागृती निर्माण केली. स्वच्छ भारत, सुंदर भारत, समृध्द भारत हा संदेश नागरिकांना दिला. काही ठिकाणी नागरिकांना या उपक्रमात सहभागी करुन घेत एकत्र काम करण्याचा व स्वच्छतेची धरु कास, देशाचा होईल विकास हा संदेश दिला. स्वच्छ भारत ठेवणे हीच महात्मा गांधीना खरी श्रध्दांजली ठरेल असाही संदेश गावकऱ्यांना स्वयंसेवकांनी दिला. या अभियानामुळे भविष्यात प्लॅस्टीकचा वापर कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली अशी माहिती रासेयो विभागाचे संचालक डॉ.सचिन नांद्रे यांनी दिली.

Exit mobile version