विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार मंडळावर दिलीप वैद्य यांची नियुक्ती

रावेर प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या “आजीवन अध्ययन व विस्तार मंडळावर” तालुक्यातील बलवाडी येथील पाटील विद्यालयाचे शिक्षक दिलीप वैद्य यांची विशेष आमंत्रित व तज्ज्ञ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.पी. पाटील यांनी ही निवड केल्याचे पत्र या विभागाचे प्रभारी संचालक मनीष जोशी यांनी नुकतेच पाठविले आहे. औपचारिक शिक्षण प्रवाहात नसणाऱ्या व्यक्तींसाठी शिक्षणाची सोय व्हावी म्हणून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मध्ये या आजीवन अध्ययन व विस्तार मंडळाची रचना सुचविण्यात आली आहे. आजीवन अध्ययन व विस्तार मंडळ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्यामार्फतही अशाच प्रकारचे प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. यासाठी विविध संस्थांकडून वेगवेगळे अभ्यासक्रम मागणीसाठी प्राप्त होणारे प्रस्ताव तसेच कोर्सेसची यादी आणि केंद्र मान्यतेची पद्धती, त्याची छाननी यासाठी नियमाप्रमाणे कुलगुरू डॉ पाटील यांच्या मान्यतेने समिती गठीत करण्यात आली असून या समितीत विशेष आमंत्रित व तज्ज्ञ म्हणून आपली निवड झाली असल्याचे श्री वैद्य यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. आ. शिरीष चौधरी आणि फैजपूर येथील लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.व्ही.आर. पाटील यांनी खिरोदा येथे त्यांचे अभिनंदन केले आहे.

Protected Content