Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा सुरळीत होण्यासाठी एकमेकांशी समन्वय ठेवावा- पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

जळगाव, प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या (बॅकलॉगसह) विद्यार्थ्यांच्या येत्या 12 ऑक्टोबर पासुन परीक्षा सुरु होत आहे. या परीक्षांसाठी जिल्हा प्रशासन, महावितरण, परिवहन महामंडळ, पोलिस व आरोग्य विभाग आदिंनी एकमेकांशी समन्वय राखून परीक्षा सुरळीत पार पाडण्याचे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेत.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत परीक्षेसंबंधी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील, प्र-कुलगुरू प्रा. पी.पी. माहुलीकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे, राज्य परिवहन महामंडळाचे वाहतुक अधिकारी दिलीप बंजारा, महावितरणचे प्रतिनिधी एम.व्ही. चौधरी, अधिष्ठाता प्रा. ए. बी. चौधरी, प्रभारी कुलसचिव प्रा. बी. व्ही. पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक बी. पी. पाटील, उपकुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर आदी उपस्थित होते.

प्रारंभी बी.पी. पाटील यांनी अंतिम वर्ष/अंतिम सत्राच्या परीक्षेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने परीक्षा देणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या 53 हजार 564 एवढी असल्याचे सांगितले. यामध्ये ऑनलाईन पर्याय 39 हजार 90 विद्यार्थ्यांनी तर ऑफलाईन पर्याय 14 हजार 474 विद्यार्थ्यांनी निवडला असल्याची माहिती दिली. ऑफलाईनसाठी जळगाव जिल्ह्यात 7 हजार 298 तर ऑनलाईनसाठी 21 हजार 934 परीक्षार्थी आहेत. जळगाव जिल्ह्यात ऑफलाईनसाठी 94 परीक्षा केंद्र असणार आहेत असे यावेळी सांगण्यात आले. कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांनी यावेळी विद्यापीठाच्यावतीने परीक्षांच्या पुर्वतयारीची सविस्तर माहिती दिली. विद्यापीठाच्यावतीने सराव चाचण्या (मॉकटेस्ट) घेण्यात येत आहेत. याशिवाय मॉडेल प्रश्नसंच देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल. असे कुलगुरूंनी यावेळी स्पष्ट केले.

पालकमंत्री ना. पाटील म्हणाले की, ऑनलाईन परीक्षा देतांना विद्यार्थ्यांना वीज पुरवठ्याचा व्यत्यय येवू नये यासाठी जिथे लोडशेडींग केले जाते त्या गावांमध्ये वेळा बदलण्याच्या सुचना महावितरणच्या प्रतिनिधींना केल्या. विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातून परीक्षा केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी एस.टी. महामंडळाने बसेसची पुरेशी व्यवस्था करावी, परीक्षा केंद्रावर येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी योग्य त्या प्रतिबंधक उपाययोजना करून घेतली जावी, शक्य असेल तिथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तालुकास्तरावर परीक्षा देण्यासाठी सूचना कराव्यात, दिव्यांग विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाही याची काळजी घ्यावी, आवश्यक त्या परीक्षा केंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त द्यावा अशा सूचनाही त्यांनी संबंधित विभागांच्या प्रतिनिधींना केल्या. विद्यापीठाच्या पुर्वतयारीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. बी.पी. पाटील यांनी शेवटी आभार मानले.

Exit mobile version