Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेचा पारितोषिक वितरण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी मोठ्या जल्लोषात झाला.

कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंचावर प्र-कुलगुरू प्रा. एस.टी.इंगळे, प्रमुख पाहुणे म्हणून नॅचरली युवर्स बायोटेक, जळगावचे व्यवस्थापक डॉ. निलेश तेली व नोव्होटा थर्मोटेक प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक आर.वाय. चौधरी यांची उपस्थिती होती. याशिवाय कुलसचिव डॉ. विनोद पाटील, स्पर्धेचे समन्वयक प्रा.एस.आर.कोल्हे, उपसमन्वयक, प्रा.जे.व्ही. साळी, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक प्रा. सुनील कुलकर्णी उपस्थित होते.

शुक्रवारी या संशोधन स्पर्धेला प्रारंभ झाला. ४४५ विद्यार्थ्यांद्वारे २८८ मॉडेल्स व पोस्टर्सचे सादरीकरण या स्पर्धेत झाले. शनिवारी सांयकाळी पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी परीक्षकांच्यावतीने बी.जे. राठी यांनी तर सहभागींच्या वतीने राकेश पाटील (धुळे), पल्लवी जाधव (नंदुरबार) यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हास्तरावर झालेल्या अविष्कार संशोधन स्पर्धेचे समन्वयक व उपसमन्वयक डॉ. भूषण कवीमंडन, डॉ. मनोज चोपडा (मु.जे.महाविद्यालय, जळगाव), डॉ. भटू बागूल, डॉ. रवींद्र पाटील (वसंतराव नाईक महाविद्यालय, शहादा), प्रा. एन.एस. पवार, डॉ. एस.के. जाधव (कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिंदखेडा), डॉ. व्ही.व्ही. गिते, डॉ.व्ही.एम. रोकडे (विद्यापीठ कॅम्पस) यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलतांना आर.वाय. चौधरी म्हणाले की, समाजाला आर्थिकदृष्टया परवडणाऱ्या नाविन्यपूर्ण कल्पना संशोधनाद्वारे मांडल्या जाव्यात. तर डॉ. निलेश तेली म्हणाले की संशोधनातील सर्जनशीलतेला वाव देवून नोकरी करणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे व्हा. अध्यक्षीय भाषणात प्रा. माहेश्वरी म्हणाले की, संघर्ष करत उद्योजकतेमध्ये जम बसविलेल्या व्यक्तींचे अनुभव विद्यार्थ्यांना ऐकायला मिळावेत यासाठी आपण उद्योजकांना निमंत्रीत केले आहे. प्रारंभी स्पर्धेचे समन्वयक प्रा.एस.आर.कोल्हे यांनी स्पर्धेचा आढावा सादर केला. सुत्रसंचालन डॉ.जी.ए.उस्मानी यांनी केले. डॉ अजय सुरवाडे यांनी आभार मानले.

Exit mobile version