Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विदर्भात २ दिवसांत उष्णतेची दुसरी लाट येण्याची शक्यता

 

पुणे : वृत्तसंस्था । विदर्भ वगळता राज्यात इतरत्र सध्या दिवसाच्या कमाल तापमानात गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत घट झाली असली,   तीन दिवसांत तापमानाचा पारा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.  विदर्भात ५ ते ७ एप्रिल या कालावधीत उष्णतेची दुसरी लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

 

निरभ्र आकाश आणि कोरडय़ा हवामानाच्या स्थितीमुळे राज्यातील तापमानात गेल्या आठवडय़ात मोठी वाढ झाली होती. उत्तरेकडील काही राज्ये आणि गुजरातमध्ये उष्णतेची तीव्र लाट होती. कोकणपाठोपाठ विदर्भातही उष्णतेची लाट आली होती. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात बहुतांश ठिकाणी  पारा ४० अंशांपर्यंत गेला होता. सध्या दक्षिण महाराष्ट्राची किनारपट्टी आणि लगतच्या भागावर चक्रीय चक्रवात तयार झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे.

 

मध्य महाराष्ट्रात सोलापूर वगळता इतरत्र तापमान सरासरीच्या जवळ आणि ४० अंश सेल्सिअसच्या खाली आहे. कोकण विभागातही बहुतांश ठिकाणी तापमान कमी झाले आहे.

 

विदर्भात मात्र सर्वत्र ४० ते ४३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे. शनिवारी राज्यातील उच्चांकी किमान तापमान ब्रह्मपुरी येथे ४३.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. मध्य प्रदेशातही उष्णतेची लाट असणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण विभागातही  तापमानाचा पारा ३ अंशांनी वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Exit mobile version