विज्ञान शाखेत इंग्रजीला ऐच्छिक मराठी हा पर्याय असावा – लक्ष्मीकांत देशमुख

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | उच्च शिक्षणाच्या विज्ञान शाखेत इंग्रजीला ऐच्छिक मराठी हा पर्याय असावा या अनुषंगाने मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष व अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सोमवारी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विज्ञान विद्याशाखेच्या काही प्राध्यपकांसमवेत चर्चा केली. यावेळी कुलगुरू प्रा.व्ही. एल. माहेश्वरी उपस्थित होते.

 

बैठकीत बोलतांना लक्ष्मीकांत देशमुख यांनी, राज्य सरकारकडे मराठीचे धोरण असलेला मसूदा तयार करून दिला आहे. सर्वस्तरावर मराठी भाषेत व्यवहार व्हावेत अशी अपेक्षा असून इंग्रजीच्या अतिक्रमणामुळे भाषिक भेद वाढीला लागला आहे. मराठी ही ज्ञानभाषा व्हावी असा शासनाचा अग्रह असून उच्च शिक्षण देखील विशेषत: विज्ञानाचे पदवी आणि पदव्युत्तरस्तरावरील शिक्षणही मराठी भाषेत विद्यार्थ्यांना मिळावे ज्यामुळे त्यांची इंग्रजीची भिती दूर होईल. यासाठी विद्यापीठांमधील विज्ञानाच्या प्राध्यपकांसमवेत हा संवाद असल्याचे ते म्हणाले. टप्प्या टप्प्यात काही महाविद्यालयांमध्ये पदवीस्तरावर विज्ञानाचे शिक्षण मराठीतून दिले जाऊ शकते त्यासाठी विद्यापीठांना काही विषयांची जबाबदारी देण्याचा मानस आहे असे ते म्हणाले. यावेळी झालेल्या चर्चेत कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी शिकण्याची संसाधने मराठीत उपलब्ध करून द्यायला हवीत असे सांगितले. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे, प्रा.जे. बी. साळी, प्रा. एस. बी. अत्तरदे, प्रा.अरूण इंगळे, प्रा. डी. एच. मोरे, प्रा. समिर नारखेडे, प्रा. आशुतोष पाटील यांनी चर्चेत भाग घेऊन काही सूचना मांडल्या.

Protected Content