Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विकृत कानडी मनोवृत्तीचा बंदोबस्त करा : मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

मुंबई प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व देशाचे दैवत असतांना कानडी विकृत मनोवृत्ती मराठीच्या द्वेषापोटी हिणकस काम करत आहे. यामुळे या विकृत मनोवृत्तीचा तातडीने बंदोबस्त करा अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

कर्नाटकातल्या प्रकाराबद्दल देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. यावरून आता मुख्यमंत्र्यांनी थेट पंतप्रधानांकडेच हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, गेले कित्येक वर्ष कर्नाटकातील मराठी बांधवांवर अत्याचार केला जात आहे आणि आता तर शिवरायांसारख्या आपल्या आराध्य दैवताची विटंबना करण्याची घटना घडते आणि तेथील सरकार याकडे डोळेझाक करते हे दुर्दैवी आहे. नुकतेच वाराणसीत काशी विश्वेश्वराच्या मंदिरात पंतप्रधानांनी आपल्या भाषणात, देशाची संस्कृती चिरडण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पराक्रमी राजे निर्माण झाले असे कौतुकोद्गार काढले होते. या कार्यक्रमास काही दिवस झाले नाही तोच, भाजप शासित कर्नाटकात याच शिवरायांची विटंबना होते, आणि कुणावर कारवाई न करता उलट मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो हे अतिशय निंदनीय आणि अवमानकारक आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी पुढे म्हटले आहे की, हा कानडी अत्याचार बंद करण्यासाठी आता पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने तेथील राज्य सरकारला आदेश द्यावेत आणि या विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यास सांगावे. बेळगावात मराठी भाषिकांच्या गळचेपी करायची. सनदशीर मार्गाने सीमाप्रश्नी लढा देत असलेल्या मराठी भाषिकांवर कन्नड कर्मठांकडून हल्ला करायचे. असे भ्याड प्रकार थांबविण्याऐवजी त्याला खतपाणी घालायचे हे चालणार नाही. छत्रपतींचे नाव केवळ राजकारणासाठी घ्यायचे आणि आमच्या दैवताचा अनादर झाल्यावर मात्र बोटचेपी भूमिका घ्यायची. हे कदापिही खपवून घेतले जाणार नाही. मराठी अस्मितेला डिवचणे परवडणारे नाही हे ध्यानात घ्यावे. यात केंद्र सरकारनेही दुतोंडी भूमिका सोडून ठोस पावले उचलावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

Exit mobile version