Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वर्षा राऊतांना ‘ईडी’कडून आणखी एक समन्स; पुन्हा चौकशी होणार

 

मुंबई: वृत्तसंस्था । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची सक्तवसुली संचलनालयाकडून पुन्हा चौकशी होणार आहे. त्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना नवे समन्स पाठवले आहे.

वर्षा राऊत यांना ११ जानेवारील पुन्हा एकदा चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

यापूर्वी ४ जानेवारीला पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास चार तास वर्षा राऊत यांना प्रश्न विचारले होते. प्रवीण राऊत हे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातील आरोपी आहेत. प्रवीण राऊत यांच्याशी संजय व वर्षा राऊत यांचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे.

पीएमसी बँकेतील कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी वर्षा राऊत यांना २९ डिसेंबर रोजी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बँकेतील खात्याशी संबंधित कागदपत्रं घेऊन कार्यालयात येण्यास नोटिशीत सांगितलं आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधवी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. मात्र त्यांची जामिनावर सुटका झाली.

माधुरी राऊत यांनी २३ डिसेंबर २०१० रोजी वर्षा राऊत यांच्या खात्यात ५० लाख आणि १५ मार्चला ५ लाख रुपये जमा केले होते. हे बिनव्याजी कर्ज असल्याचे सांगण्यात येते. या पैशातून वर्षा राऊत यांनी दादरमध्ये सदनिका विकत घेतली होती. वर्षा आणि माधुरी राऊत या अवनी कन्स्ट्रक्शनमध्ये भागीदार आहेत.

वर्षा राऊत यांचे अवनी कन्स्ट्रक्शनमध्ये अवघ्या ५६२५ रुपयांचे भांडवल होते. मात्र, तरीही त्यांना १२ लाखांचे कर्ज देण्यात आले होते. हे कर्ज त्यांनी अजूनही फेडलेले नाही. त्यामुळे आता ईडीकडून वर्षा राऊत यांनी विकत घेतलेल्या फ्लॅटची आणि अवनी कन्स्ट्रक्शनमधील व्यवहारांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version