Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘वर्क फ्रॉम होम’साठी आयटी कंपन्यांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

नवी दिल्ली वृत्तसंस्था । आयटी आणि बीपीओ कंपन्यांतील कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यास दिलेल्या सवलतीची मुदत वर्षअखेरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आयटी कर्मचारी आता ३१ डिसेंबर २०२० पर्यंत घरुन काम करु शकतील. त्यामुळे आता थेट पुढच्या वर्षी ऑफिसला जावे लागू शकते.

आयटी कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यास ३१ जुलैपर्यंत सूट देण्याच्या सूचना केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिल्या होत्या. हा कालावधी संपत आल्याने थेट आणखी पाच महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

‘कोविड-१९’ मुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेऊन ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याबाबत दूरसंचार मंत्रालयाने अन्य सेवा प्रदात्यांना अटी व शर्तींमध्ये दिलेल्या सवलती ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढवल्या आहेत.” असे ट्वीट दूरसंचार मंत्रालयाने केले आहे.

सध्या आयटी कर्मचार्‍यांपैकी जवळजवळ ८५ टक्के घरुन काम करत आहेत, तर केवळ जिकिरीचे काम करणारे कर्मचारी कार्यालयात जात आहेत. काही ठिकाणी शिफ्टमध्ये काम चालते, तर काही ठिकाणी रोटेशननुसार एक आड एक आठवडा कर्मचाऱ्यांना बोलवले जाते. बाहेरगावी राहणारे बहुतांश कर्मचारी आपल्या घरी कुटुंबियांजवळ आहेत. कोणी प्रियजनांसोबत राहता येत असल्याने आनंदात आहे, तर बऱ्याच जणांना मात्र वाढलेल्या कामाचा तापच होत आहे. कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर होण्याच्या आधीपासूनच आयटी कर्मचारी घरुन काम करत आहेत.

Exit mobile version