Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वर्क फ्रॉम होममुळे कामाचा वेळ वाढला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोनामुळे गेले सहा महिने बहुतांश भारतीय वर्क फ्रॉम होम करीत आहेत. बसल्या जागीच कामाची संधी मिळाली, असली तरी त्यांच्या कामकाजाच्या वेळेत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

वर्कप्लेस सॉफ्टवेअर डेव्हलपर अॅटलासियनतर्फे ६५ देशांमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार जगभर वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून काम करणारी मंडळी सकाळी लवकर लॉग इन करत असून, कामकाजाची वेळ संपली तरी त्यांचे लॉग ऑफ संपत नसल्याचे दिसून आले आहे. चालू वर्षाच्या सुरुवातीच्या तुलनेत एप्रिल आणि मे मध्ये भारतीयांच्या सरासरी कामकाजाच्या वेळेत ३२ मिनिटांची वाढ झाल्याचे दिसून आले. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकी कर्मचाऱ्यांच्या कामकाजाच्या वेळेतही ३२ मिनिटांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

वर्क फ्रॉम होमच्या काळात कामकाजाच्या वेळेत सर्वाधिक वाढ इस्राइलच्या कर्मचाऱ्यांबाबत झाली आहे. त्यांच्यात कामकाजाच्या वेळेत ४७ मिनिटांची वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेच्या (३८ मिनिटे) कर्मचाऱ्यांच्या कामकाजाच्या वेळेत वाढ झाली आहे.

वर्क फ्रॉम होमचा अवलंब करणाऱ्या बहुतांश कर्मचाऱ्यांना सकाळी आणि संध्याकाळी अतिरिक्त काम करावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पादकतेत (प्रोडक्टिव्हिटी) घट होत आहे. घरून काम करणारे कर्मचारी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत अन्य विशेष लाभ घेत असल्याचेही दिसून आले आहे. वर्क फ्रॉम होममुळे खासगी आयुष्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत असल्याचे मतही काही कर्मचाऱ्यांनी नोंदवले आहे. लॉकडाउनच्या काळात जाहीर करण्यात आलेल्या वर्क फ्रॉम होममुळे घर आणि ऑफिस यांच्यातील सीमारेषा धूसर झाली असल्याचेही मत अभ्यासात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी नोंदवले.

Exit mobile version