Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वनमंत्रीपदाची हरिभाऊ राठोड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 

मुंबई : वृत्तसंस्था । विदर्भातील शिवसेना नेते संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात  मंत्रिपद गमवावे लागल्यावर आता शिवसेनेचे नेते हरीभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून संजय राठोड यांच्याजागी मला वनमंत्री पद द्या अशी मागणी केली आहे.

 हरीभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना दोन पत्र लिहिली असून भेटीसाठी वेळ मागितला आहे.

हरीभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना ७ मार्च रोजी पहिलं पत्र लिहिलं आहे. तर दुसरं पत्र ११ मार्चला पाठवलं आहे. या पत्रांमध्ये हरीभाऊंनी शिवसेनेला बंजारा समाजाची गरज असल्याचा उल्लेख केला आहे. हरीभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी दहा मिनिटांचा वेळ मागितला आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या वनमंत्री पदी बंजारा समाजाचे नेते म्हणून आपल्याला संधी द्यावी अशी मागणी या पत्रामध्ये हरीभाऊंनी मुख्यमंत्र्यांकडे की आहे. “वंचित घटकाला मुख्यमंत्री नक्की न्याय देतील असा मला विश्वास आहे. संधी मिळाल्यास आपण विदर्भामध्ये शिवसेनेला पहिल्या क्रमांकाचा पक्ष करण्याचा प्रयत्न करु. याचसंदर्भात राजकीय चर्चा करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितला असून ते नक्की वेळ देतील,” अशी प्रतिक्रिया हरीभाऊ राठोड यांनी ‘व्यक्त केलीय.

“तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी मी स्वत:ची आमदारकी पणाला लावली. अन्यथा मला काँग्रेसच्या कोट्यातून सहज मंत्रिपद मिळाले असते. त्यामुळे आता वनमंत्रीपद मला द्यावे,” असं हरीभाऊ यांनी पत्रात म्हटलं आहे. शिवसेनेमध्ये बिनशर्त प्रवेश केल्याची आठवण करुन देत, सत्तेत आल्यास खारीचा वाटा देऊ असं उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचंही हरीभाऊ यांनी पत्रात नमूद केलं आहे.

हरीभाऊ राठोड यांच्याकडे बंजारा समाजातील विदर्भातील प्रमुख नेत्यांपैकी एक म्हणून पाहिलं जातं. विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी विदर्भामध्ये शिवसेनेचा जोरदार प्रचार केला होता. 

पोहरा देवीचे  महंत सुनील महाराज यांनी हरीभाऊ राठोड यांना संजय राठोड यांच्या जागी वनमंत्री पद दिलं जाणार असेल तर या निर्णयाचं आम्ही बंजारा समाजाच्या वतीने स्वागत करतो असं म्हटलं आहे. हरीभाऊ हे ७२-७३ वर्षांचे नेते आहेत. त्यामुळे समाजातील नेते म्हणून आमचा त्यांना पाठिंबा असेल. संजय राठोड हे राज्यातील दोन कोटी बंजारा समाजाचे नेतृत्व करत आहेत. देशामध्ये बंजारा समाजाचे १२ कोटी लोकं असल्याने या सामाजातील नेत्यांना संधी दिली पाहिजे, असं मत सुनील महाराज यांनी व्यक्त केलं आहे.

विदर्भात सेनेचे विधानसभेत चार, विधान परिषदेत दोन आणि पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे पण अपक्ष म्हणून निवडून आलेले दोन असे एकूण आठ आमदार आहेत. यात  संजय राठोड (दिग्रस-जि. यवतमाळ), संजय रायमुलकर (मेहकर-जि.बुलढाणा), संजय गायकवाड (बुलढाणा), नितीन देशमुख (बाळापूर-जि. अकोला) हे विधानसभेत तर गोपीकिसन बाजोरिया (अकोला), दुष्यंत चतुर्वेदी (नागपूर) हे विधान परिषदेत आणि आशीष जयस्वाल (रामटेक-जि. नागपूर) व नरेंद्र भोंडेकर (भंडारा) या दोन अपक्ष सदस्यांचा समावेश आहे. मंत्रिपद देताना सेनेला राठोड वगळता याच सात नावांमधून एकाची निवड करावी लागेल. संघटनात्मक बाब व  निकषावर मेहकरचे संजय रायमुलकर अधिक प्रबळ दावेदार ठरतात. ते  २००९, २०१४ व २०१९ या सलग तीन निवडणुकांमध्ये विजयी झाले. जिल्ह्य़ात संघटना वाढवण्यात त्यांचे मोठे  योगदान आहे.

इतर दोन आमदार अनुक्रमे  नितीन देशमुख आणि संजय गायकवाड प्रथमच विधानसभेवर निवडून आले आहेत. विधान परिषदेतून निवड करायची झाल्यास ज्येष्ठत्वाच्या निकषावर गोपीकिसन बाजोरिया यांचे नाव अग्रस्थानी आहे. अपक्षांना संधी द्यायचे ठरले तर जयस्वाल किंवा भोंडेकर यापैकी एकाला संधी द्यावी लागेल. जयस्वाल हे सुद्धा तिसऱ्यांदा निवडून आल्याने त्यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो. चौकशीचा ससेमिरा संपल्यावर राठोड यांना पुन्हा मंत्रिपद दिले जाऊ शकते, असा दावा राठोड समर्थक करतात. 

Exit mobile version