वडिलांच्या नंतर मुलाकडे धुरा : सोनवणे कुटुंबाच्या शिरपेचात मानाचा तुरा !

जळगाव-आशुतोष हजारे ( एक्सक्लुझीव्ह अॅनालिसीस ) | जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज शामकांत सोनवणे यांच्याकडे सभापतीपदाची धुरा आली असून त्यांचे वडिल दिवंगत बळीरामदादा सोनवणे यांच्या पश्‍चात ते या पदावर आरूढ झाल्याचा योगायोग घडून आला आहे.

 

आज जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विलक्षण नाट्यमय घटना घडल्या. गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत काही तरी होणार असल्याची कुजबुज सुरू होती. तथापि, महाविकास आघाडीच्या सुदैवाने असे काही घडले नाही. तथापि, सभापतीपदाच्या निवडीत अप्रिय प्रकार घडून मविआमधील वाद जगजाहीर झाले.

 

मविआच्या पॅनलचे एक प्रमुख आधारस्तंभ असणारे लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर हे आपल्याला पहिल्यांदा बाजार समितीच्या सभापतीचे पद हवे यावर अडून बसले. तर, पहिल्या वर्षी शामकांत सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली. यातून लकी टेलर यांनी उमेदवारी दाखल केली. मात्र शामकांत सोनवणे यांनी बाजी मारली. अर्थात, यामुळे त्यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडली. तर पांडुरंग पाटील हे उपसभापती झाले.

 

दरम्यान,  आज सभापतीपद पटकावून शामकांत सोनवणे यांनी सहकारातील आपली यशस्वी वाटचाल पुढे सुरू ठेवली आहे. याआधी त्यांनी जिल्हा बँकेत उपसभापतीपद सांभाळले होते. तर आता जळगाव बाजार समितीची धुरा त्यांच्याकडे आली आहे. लक्षणीय बाब म्हणजे त्यांचे वडिल दिवंगत बळीरामदादा सोनवणे यांच्या नंतर त्यांनी या पदाचा कार्यभार सांभाळला आहे.

 

बळीरामदादांनी तब्बल १४ वर्षे सभापतीपद सांभाळले होते. त्यांच्या कार्यकाळात शेतकरी आणि व्यापारी हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले होते. बाजार समितीला प्रगतीपथावर नेण्याचे काम त्यांनी केले होते. आता हाच वारसा सांभाळण्यासाठी आज शामकांत सोनवणे हे बाजार समितीत दाखल झाले असून हा एक मोठा योगायोग मानला जात आहे. तर सोनवणे कुटुंबाच्या यशस्वी वाटचालीतील हा मैलाचा दगड देखील ठरणार आहे.

Protected Content