लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक कोरोनामृत्यू पेरू देशात

 

 

वाशिंग्टन : वृत्तसंस्था ।  दक्षिण अमेरिकेतील पेरु देशामध्ये कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या लोकसंख्येच्या तुलनेत जगात सर्वाधिक आहे.

 

मागील वर्षी या देशामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यापासून आतापर्यंत येथे एक लाख ८० हजार जणांचा मृत्यू कोरोनामुळे झालाय. मरण पावलेल्या व्यक्तींच्या आकडेवारीसंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीने नुकताच आपला अहवाल पेरुच्या राष्ट्रपती भवनामध्ये सादर केला. त्यावेळी ही धक्कादायक आकडेवारी समोर आली. नव्या आकडेवारीमुळे पेरुमधील मृतांची संख्या दुप्पटीने वाढल्याचं वृत्त आहे.

 

सरकारने स्थापन केलेल्या समितीने केलेल्या अभ्यासामध्ये ३ कोटी २६ लाख लोकसंख्या असणाऱ्या या देशामध्ये  १ लाख ८० हजार ७६४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अहवाल सादर होण्यापूर्वी देशातील मृतांची संख्या ६९ हजार ३४२ होती. जी आता अडीच पटींने वाढलीय. मागील वर्षी मार्च महिन्यापासून या वर्षीच्या २२ मे पर्यंतची ही मृतांची आकडेवारी आहे. आरोग्य मंत्री ऑस्कर उगार्ते यांनी सांगितले की  मरण पावलेल्यांची संख्या मोजण्यासंदर्भातील नियम बदलण्यात आले आहेत.  संसर्ग निश्चित झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतरच तो कोरोनामुळे झालेला मृत्यू आहे असं आधी ठरवण्यात आलं होतं. आता मात्र संसर्ग झाल्याचं निश्चित होण्याबरोबरच सदृश्य लक्षणं असल्याने मृत्यू झालेल्यांची संख्या कोरोना मृत्यूंमध्येच मोजण्यात आलीय.

 

या नवीन आकडेवारीमुळे दर १० लाख लोकसंख्येमागे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत पेरु अव्वल स्थानी पोहचलाय. सर्वाधिक प्रादुर्भाव अमेरिकेमध्ये झाला असून तिथे आतापर्यंत ३ कोटी ४१ लाख लोकांना संसर्ग झालाय. अमेरिकेत सहा लाख जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सर्वाधिक  रुग्णांच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानी आहे. भारतामध्ये २ कोटी ८० लाख जणांना  संसर्ग झाला असून मरण पावणाऱ्यांची संख्या ३ लाख ३० हजारांहून अधिक आहे.

 

Protected Content