Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लोकक्षोभाची दखल : आदिपुरूषमधील ‘ते’ संवाद कापणार !

मुंबई-नुकत्याच प्रदर्शीत झालेल्या आदिपुरूष चित्रपटातील काही संवादांवरून जोरदार ट्रोलींग झाल्यानंतर अखेर हे संवाद कापण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

 

आदिपुरुष चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्यावरुन वाद सुरु आहे. या चित्रपटातील व्यक्तीरेखांबरोबरच या व्यक्तीरेखांच्या तोंडी देण्यात आलेल्या संवादांवर अनेकांनी आक्षेप घेतले आहेत. या चित्रपटाचे संवाद लिहिणारे प्रसिद्ध संवाद लेखक, गीतकार मनोज मुंतशीर  यांनाही सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. त्यांना सोशल मीडियातून अनेकांनी खडे बोल सुनावले असून बर्‍याच जणांनी अगदी शिवीगाळ देखील केली आहे.

 

दरम्यान, या संदर्भात आज मनोज मुंतशीर यांनी सोशल मीडियातून आपली भूमिका मांडली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, रामकथेमधून पहिली शिकवण घ्यायची झाली तर ती म्हणजे, सर्वांच्या भावनांचा सन्मान करा. ती भावना चूक आहे की बरोबर हे वेळेनुसार बदलतं मात्र भावना कायम राहते. आदिपुरुष चित्रपटामधील ४ हजारांहून अधिक संवाद मी लिहिले आहेत. मात्र ५ वाक्यांनी काहींच्या भावना दुखावल्या. उर्वरित वाक्यांचे कुणी कौतुक केले नसल्याची खंत मनोज मुंतशीर यांनी व्यक्त केली आहे.

 

मनोज मुंतशीर पुढे म्हणाले की, ३ तासांच्या चित्रपटामध्ये ३ मिनिटांचे संवाद मी तुमच्या कल्पनांपेक्षा फार वेगळे लिहिले असतील. मात्र तुम्ही यावरुन माझ्या कपाळावर सनातन धर्माविरोधात असल्याचं लिहून मोकळे झालात. एवढी घाई का केली, हे मला कळलं नाही.  मी आणि चित्रपटाचे निर्माते तसेच दिग्दर्शकांनी निर्णय घेतला आहे की काही संवादांचा प्रेक्षकांना त्रास होत आहे. आम्ही यामध्ये बदल करुन आणि याच आठवड्यात त्यांचा चित्रपटामध्ये समावेश करणार आहोत. श्री राम तुम्हाला सर्वांवर त्याची कृपा अशी ठेवो, असं पोस्टच्या शेवटी मनोज मुंतशीर यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version