Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लॉक डाउन चा नक्की काय फायदा झाला ? , ते सांगा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था / पावसाळी आधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाचे कामकाज बुधवारी सुरु झाले. बुधवारी राज्यसभेमध्ये कोरोनाबाधितांच्या आकडेवारीसंदर्भात चर्चा झाली. देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्याने ५० लाखांचा टप्पा ओलांडल्यानच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सरकारवर निशाणा साधला. काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी करोनाचा मुद्दा उपस्थित केला. कोरोनासंदर्भात आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सरकारी बाजू मांडून माहिती दिली. त्यानंतर आनंद शर्मा यांनी “ सरकारने लॉकडाउन लागू केला होता. या लॉकडाउनचा नक्की काय काय आणि कसा फायदा झाला हे सरकारने सदस्यांना सांगावे,” अशी मागणी केली.

आनंद शर्मा यांनी, “आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाउनच्या निर्णयामुळे बाधितांचा आकडा १४ ते २९ लाखांदरम्यान संथ गतीने वाढला तर मृत्यू झालेल्याची संख्या ३७ हजार ते ७८ हजारांपर्यंतच मर्यादित राहिल्याचे सांगितले. मात्र या आकडेवारीमागे काही वैज्ञानिक कारण आहे का हे सरकारने स्पष्ट करावे. कोणत्या आधारावर हे आकडे सांगण्यात आले आहेत याचा खुलासा करवा,” अशी मागणी केली. “चार तासांचा अवधी देत जो लॉकडाउन लागू करण्यात आला त्यामुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागला. गरीब आणि कामगारांसमोर दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला. संपूर्ण जगाने भारतातील ही परिस्थिती पाहिली आहे त्याकडे कानाडोळा करता येणार नाही,” असंही आनंद म्हणाले.

“किती प्रवासी मजुरांचा मृत्यू झाला याची आकडेवारी आपल्याकडे नाही असं सरकारने सांगितलं आहे. हे खूपच दूर्देवी आहे. यापुढे प्रवासी मजुरींसंदर्भातील आकडेवारीची नोंद ठेवण्यासाठी एक राष्ट्रीय डेटा बेस तयार करण्यात यावा,” अशी मागणीही आनंद यांनी केली.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाने सरकारला लॉकडाउनदरम्यान किती स्थलांतरीत कामगारांचे मृत्यू झाले? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने, “विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या ६८ दिवसांच्या लॉकडाउनमध्ये किती लोकांचा मृत्यू झाला, याची सरकारजवळ कोणतीही माहिती नाही,” असं सांगितलं होतं.

Exit mobile version