Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लॉकडाऊनमध्ये गरीब व गरजूंना शिवभोजन थाळी ठरतेय वरदान ; जळगाव जिल्ह्यात दररोज 925 फूड पॅकेटचे वाटप

 

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाची शिवभोजन थाळी योजना कोरोना प्रादुर्भावाच्या काळात निराश्रित, निराधार, बेघर असणाऱ्या अनेकांसाठी उपयुक्त ठरत आहे. जिल्ह्यात जळगाव शहरातील 9 केंद्रासह व मुक्ताईनगर तालुक्यातील एका केंद्रावर जवळपास 925 थाळी रोज नागरिकांना वाटप केल्या जात आहे. लवकरच अन्य तालुक्यांमध्ये देखील ही सुविधा उपलब्ध होणार आहे. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी दिली आहे.

 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणजे शिवभोजन थाळी होय. ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रित, निराधार, बेघर अवस्थेत असणाऱ्या नागरिकांना रोजच्या जेवणाची सुविधा शिवभोजन थाळी योजनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध केली.

 

कोरोना विषाणू संसर्ग काळामध्ये ही योजना जळगाव जिल्ह्यातील गरीब, गरजू आणि निराश्रित यांच्यासाठी वरदान म्हणून सिद्ध होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या काळात शिवभोजन थाळीची किंमत 10 रुपयांवरून आता केवळ 5 रुपये केली आहे. तसेच शिवभोजन केंद्राची वेळही सकाळी 11 ते दुपारी 3 अशी वाढविण्यात आली आहे. यामुळे अल्प मिळकत असणाऱ्यांसाठी ही योजना उपयोगी ठरत आहे.

 

जळगाव जिल्ह्यात लाॅकडाऊनच्या काळात ही योजना पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत प्रभावीपणे जिल्हा प्रशासन प्रशासन राबवित आहे. जिल्ह्याच्या पंधराही तालुक्यांमध्ये आगामी काळात शिवभोजन थाळी सुरू करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत ही योजना जळगाव शहरात 9 ठिकाणी सुरू आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीच्या काळात ही योजना राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुक्ताईनगरला ही योजना सुरू होत असून याठिकाणी 150 थाळी वाटप करण्यात येणार आहे. सध्या जिल्ह्यात 925 थाळी वाटप केल्या जात आहे.

 

संचारबंदीच्या काळात सोशल डिस्टन्सींग ठेवणे अत्यावश्यक झाल्याने आता या शिवभोजन थाळीचे स्वरूप बदलले असून आता पॅक फूड अर्थात बंद डब्यामध्ये पार्सल स्वरूपात तयार जेवण दिले जात आहे. बंद डब्यामध्ये वाटप करण्यात येणाऱ्या या शिवभोजन थाळीचा वितरण करताना फोटो काढण्यात येतो. प्रत्येक ग्राहकाचे छायाचित्र काढले जात आहे. यामुळे गरजू , गरजवंत व निराश्रित लोकांनाच याचा लाभ मिळत आहे. सोबतच पुरवठादार व अन्य विभागाला हिशेब ठेवण्यासाठी हे छायाचित्र ॲपवर देखील अपलोड केले जात आहे. एक वाटी वरण, एक वाटी भात, दोन पोळ्या आणि एक वाटी भाजी असे शिवभोजन योजनेचे स्वरूप आहे.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिशय गरीब लोकांसाठी सुरू केलेल्या या योजनेची उपयुक्तता लॉकडाऊनच्या काळात आणखी प्रखरतेने पुढे आली आहे. यामुळे गरिबांना अल्पदरात भोजनाची सोय झाल्याने नागरिक शासनाला धन्यवाद देत आहे.

 

शिवभोजन थाळी केंद्राव्दारे पॅकींग स्वरुपात थाळी वाटप असे होते

 

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील कैलास कोल्ड्रीक्स कॅन्टीन-75, शासकीय जिल्हा रुग्णालय येथील साई मल्टी सर्विसेस-100, नवीन बसस्थानकाजवळील गौरीशंकर बचत गट-75, रेल्वे स्टेशन परिसरातील हाॅटेल ब्रिज विलास-150, गोलाणी मार्केट परिसर वीर युवा नामदार बहुउद्देशीय संस्थेचे केंद्र-75, तहसिल कार्यालयाजवळील ओम श्री महिला गृह उद्योग-75, शनिपेठ, बळीरामपेठ, भाजीबाजार चौक ममत्व महिला बचत गट-75, कृषी उत्पन्न बाजार समिती मधील मनोहर रेस्टॉरंट-100, रेल्वे मालधक्का मालमत्ता जवळील लोकशाही महिला बचत गटाचे केंद्र-75 तर मुक्ताईनगर तालुका–150 असे एकूण 925 थाळीचे वाटप दररोज होत आहे.

Exit mobile version