लॉकडाउन वाढवला जाण्याचे भुजबळ , वडेट्टीवार यांच्याकडून संकेत

 

मुंबई : वृत्तसंस्था । राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन १ मे नंतरही लॉकडाऊनची मुदत पुढे वाढविला जाऊ शकते  , तसा  निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत होऊ शकतो असे संकेत छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार या मंत्रिमहोदयांनी दिले आहेत

 

राज्यातील रुग्णसंख्या वाढू लागल्याने ठाकरे सरकारने १ मेपर्यंत राज्यात लॉकडाउनची घोषणा केली आहे. राज्यातील नागरिकांवर कडक निर्बंध लावण्यात आले असून सामान्यांसाठी लोकल सेवादेखील बंद करण्यात आली आहे. दुकानांनाही सकाळी चार तास सुरु ठेवण्याची परवानगी असून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. दुसरीकडे रुग्णसंख्या अद्यापही नियंत्रणात येत नसल्याने लॉकडाउन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत यासंबंधी निर्णय होण्याची शक्यता आहे.

 

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात लॉकडाउन वाढवला पाहिजे अशी मागणी केली आहे. “लॉकडाउन वाढला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. नाशिक जिल्ह्यात १९ एप्रिलला ६८०० असणारी रुग्णसंख्या गेल्या दोन दिवसात ३६०० एवढ्यावर आली आहे. रुग्णसंख्येत होणारी वाढ थांबली असून कमी होण्यास सुरुवात झाली आहे. हे एकट्या नाशिक जिल्ह्याचं आहे. १५ आमदार तिथून निवडून येत असून तिथे ही परिस्थिती आहे”.

 

“लॉकडाउन कोणालाही आवडत नसून माझाही आधीपासून विरोध आहे. पण आरोग्य सुविधा संपत आहेत. असाच  मारा सुरु राहिला तर खूप मोठा गोंधळ होईल. लॉकडाउन करुन साखळी खंडित करणे आणि रुग्ण वाढणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे,” असं भुजबळांनी सांगितलं.

 

कडक निर्बंध लावण्यात आल्यानंतर मुंबई आणि ठाण्यात रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी विदर्भ, मराठवाडा आणि राज्याच्या इतर काही भागात बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लॉकडाउन वाढवण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाईल, असे सांगून राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी १ मेनंतरही टाळेबंदी कायम राहणार असल्याचे संकेत मंगळवारी दिले.

वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं की, “विदर्भ, मराठवाडा आणि राज्याच्या काही भागात रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. परिणामी, राज्यात लॉकडाउन वाढवण्यावर मंत्रिमंडळाच्या  बैठकीत  चर्चा केली जाईल”.

 

 

 

रुग्णसंख्या वाढत आहे. त्याबरोबर प्राणवायूचा मोठय़ा प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. प्राणवायूअभावी नागपूरसारख्या शहरात नवीन कोविड के अर सेंटरला परवानगी दिली जात नाही. रुग्णालयात खाटांची कमतरता आहे. अशी अनेक आव्हाने आरोग्य यंत्रणेसमोर आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाउन पुन्हा वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Protected Content